loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगाव तालुका प्रेस क्लबतर्फे ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ मोठ्या उत्साहात

वावे दिवाळी इंदापूर(गौतम जाधव)- रायगड प्रेस क्लब संलग्न माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने आयोजित ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ सोहळा बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी गांगवली (मोकाशीवाडी), ता. माणगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आदर्श शेतकरी म्हणून विजय विष्णू दाखिणकर, वैभवी विजय दाखिणकर, रामदास महिपत धाडवे आणि शैला रामदास धाडवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माणगावचे प्रांताधिकारी संदीपान सानप, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, माणगाव पंचायत समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती मनिषा मालोरे, पंचायत समिती सदस्य अक्षय जाधव, गांगवली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली जाधव, पोस्को कंपनीचे अधिकारी कुलदीप पुरंदरे तसेच कृषी अधिकारी जगदीश पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मार्गदर्शन करताना सभापती विलास शिंदे म्हणाले की, ‘‘शेतकरी हा देशाचा खरा पोशिंदा आहे. कोणत्याही संकटाला न घाबरता तो स्वतःचे कर्तव्य पार पाडत संपूर्ण देशाच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी निभावतो. पारंपरिक शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व इतर शेतीपूरक व्यवसाय स्वीकारल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्‌या सक्षम होऊ शकतो. कोकणात शेतीचे प्रमाण कमी होत असताना शेतकरी टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.’’ जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ‘‘शासनाच्या योजनांबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. घाटमाथ्यावरील शेतकरी उपलब्ध असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ घेतात. कोकणातील शेतकर्‍यांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा आणि गावाचा विकास साधावा,’’ असे ते म्हणाले.

टाइम्स स्पेशल

प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘‘शेतकर्‍याची अथक मेहनत आणि शेतीला पूरक व्यवसायांची जोड हीच यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी इतरांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा.’’ या कार्यक्रमाचे आयोजन माणगाव तालुका प्रेस क्लबने केले होते. कार्यक्रमाला माणगाव तालुका प्रेस क्लबचे पदाधिकारी, गांगवली ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आयोजकांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg