loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. श्री. राजेश सावंत यांना रत्नागिरीत जनसागराचा भावपूर्ण निरोप

रत्नागिरी : कोकणातील राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा वसा निर्माण करणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश विनायक सावंत यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण रत्नागिरी शोकसागरात बुडाली. आपल्या लाडक्या आणि जनमानसात मिसळणाऱ्या नेत्याचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातून अनावर झालेले अश्रू साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवणारे ठरले. गुरुवारी दुपारी स्टेट बँक कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघालेली अंत्ययात्रा आणि मिरकरवाडा स्मशानभूमीत झालेला अंत्यसंस्कार अक्षरशः हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​त्यानंतर राज्यभरातून व रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा सुरू झाली. स्टेट बँक कॉलनीवरून निघून ही अंत्ययात्रा मारुती मंदिर, जिल्हा रुग्णालय आणि नगर परिषद या मार्गावरून मार्गस्थ झाली. जेव्हा अंत्ययात्रा नगर परिषदेजवळ आली, तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रवासात रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो नागरिक सहभागी झाले होते. सर्वांच्या डोळ्यांत आणि ओठांवर फक्त एकच भावना होती की, हसतमुख स्वभावाचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. ​मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी संपूर्ण राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

टाईम्स स्पेशल

​यावेळी माजी आमदार सुभाष बने, राजन साळवी, बाळ माने, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रसाद सावंत, किरण तोडणकर, शेखर घोसाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सेना-भाजपचे आदरणीय नगरसेवक, चिपळूण भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख आणि हजारो नागरिक उपस्थित होते. राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीने एक अभ्यासू, दिलदार आणि सर्वपक्षीय सलोखा राखणारा नेता गमावला असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg