loader
Breaking News
Breaking News
Foto

महिलांच्या टिपरी नृत्याला ही शासनाचे मानधन मिळावे, महिला वर्गाची मागणी

देवळे (प्रकाश चाळके) - कोकण हे लोककलेचे माहेरघर आहे. याच लोककलेतून आपल्या संस्कृतींचे प्रतिबिंब समाज मनावर उमटते. यातूनच आपला इतिहास समोर येतो. कोकणकलेतील जाकडी, नमन याप्रमाणे सध्या महिलांचे टिपरी नृत्य कोकणात जोरदार प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे महिला टिपरी नृत्य कलाकारांना ही शासनाचे मानधन मिळावे अशी महिला वर्गाची मागणी आहे. कोकणात नमन, जाखडी, भारुड, गोंधळ, भजन आणि किर्तन अशा अनेक कला आहेत. नुकतेच नमन आणि जाखडी या लोककलेला शासनाच्या वतीने राजाश्रय मिळाला. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात सादर होणारी महिलांची टिपरी नृत्य हि लोककला सुध्दा शासनाच्या लोककला प्रकारात असावी आणि टिपरी नृत्यालाहि शासनाचा राजाश्रय मिळावा. कारणं आजही ही कला उपेक्षित राहिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोककला म्हणजे आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक आहे. सण आणि उत्सवात कोकणात काही लोककला प्रकार सादर केले जातात यातून खऱ्या अर्थाने आपल्या जीवन संस्कृतीचे दर्शन घडते विशेषता रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जाकडी म्हणजे शक्ती तुरा ही कला मोठ्या प्रमाणात सादर केली जाते. त्याचबरोबर नमन हि कला रत्नागिरी जिल्ह्याचा श्वास आहे डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत नमन कला सादर केली जाते. या कलेला आता शासन दरबारी न्याय मिळाला आहे. ही सर्व कलावंतांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. सादर केलेल्या कलेचे चीज झाले आहे या शक्ती तुरा आणि नमनकले बरोबरच महिलांचे टिपरी नृत्य ही कला पाहावयास मिळते मात्र या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले दिसते. गणपती सणाची लगबग सुरू झाल्यावर जसे आपण घर अंगण सजविण्यासाठी सुरुवात होते. अगदी तशीच सुरुवात श्रावण महिन्यात नागपंचमी झाली की महिला आणि मुली टीपरी नृत्य नाचायला प्रारंभ करतात. रात्रीचा सराव करण्यासाठी महिलावर्ग वाडीतील कोणाच्या तरी घरी जातात. तिथे सराव करतात अनेक चाली नृत्याचा ठेका कसा घ्यायचा गोफ गुंपणे नवीन पौराणिक कथेवर गाणी तयार करणे, आणि त्या गाण्यांचा सराव करणे, या सर्व गोष्टीचे सराव करून महिला कलाकार गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात टिपरी नृत्य सादर करतात. जसे शक्ती तुरा कलेचे जंगी सामने होतात. त्याचप्रमाणे टिपरी नृत्याचे सामने पाहायला मिळतात. यामध्येहि शक्ती तुरा असे दोन पंथ असतात.

टाइम्स स्पेशल

मात्र आता टिपऱ्या एकाच तालावर गाणी म्हणत नृत्य सादर करणे तेवढेसे सोपे नाही. मात्र महिला आणि मुली अगदी सहजतेने चित्रपटांच्या गाण्याच्या चालीवर फार सुंदर गाणी म्हणतात त्यात समई नृत्य, गोफ नृत्य, समाज प्रबोधनपर गीते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्य चाली सादर करतात. परंतु आजही या महिला कलाकारांच्या टिपरी नृत्य कलेला अजूनही न्याय मिळालेला नाही. ही कोकणची पारंपारिक कला असून आजही ती उपेक्षित राहिली आहे. त्यामुळे टिपरी नृत्य कला जपणे सुद्धा कठीण झाले आहे. ग्रामीण भागात आजही ही कला जिवंत आहे या कलेला ऊर्जीतावस्था आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. जसे नमन आणि जाकडी कलेला शासन दरबारी राजाश्रय प्राप्त झाला आहे, तसे टिपरी नृत्य कलेला सुद्धा राजश्रय मिळावा तरच या कलेचे संवर्धन होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी टिपरी नृत्य कलेचा आवाज शासन दरबारी पोहोचवावा, अशी मागणी महिला शाहीर आणि महिला टिपरी कलाकार यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg