loader
Breaking News
Breaking News
Foto

केळघर घाटात दरड जेसीबीवर कोसळली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - केळघर–महाबळेश्वर घाटात दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी (२७ जुलै) सायंकळी सुमारे सातच्या सुमारास मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मुकवली माची गावाजवळील काळ्या कड्याजवळ अचानक जेसीबीवर दरड कोसळल्याने जेसीबी थेट दरीच्या दिशेने घसरू लागला. मात्र, चालक अजरुद्दीन याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता जेसीबीमधून उडी मारल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. या थरारक घटनेनंतर महाबळेश्वर–केळघर–मेढा–सातारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून केळघर घाटात वारंवार लहान-मोठ्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने रस्ते साफ करण्याचे काम सुरू आहे. सोमवारीही मुकवली माची गावाच्या हद्दीतील काळ्या कड्याजवळ मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने ती हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा (एमएच-११ यूडी-६३२३) क्रमांकाचा जेसीबी घटनास्थळी पाठविण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच अचानक डोंगरावरून मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा जेसीबीवर कोसळला. या जोरदार धक्क्यामुळे जेसीबीचा तोल जाऊन तो दरीच्या दिशेने सरकू लागला. मृत्यू समोर उभा ठाकल्याची जाणीव होताच चालक अजरुद्दीन याने अतिशय धाडस आणि प्रसंगावधान दाखवत तातडीने उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती साचल्यानेमहाबळेश्वर-केळघर-मेढा-सातारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. अडकलेला जेसीबी सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिरिक्त जेसीबी व यंत्रसामग्री घटनास्थळी रवाना केली आहे. प्रशासन युद्धपातळीवर रस्ता मोकळा करण्याचे काम करत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

टाईम्स स्पेशल

सततच्या पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटातून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेने घाटातील प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg