loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांनी अनुभवले शेतीचे धडे; वाटद कवठेवाडी शाळेत ‘भात लावणी’ उपक्रम उत्साहात संपन्न!

रत्नागिरी(जमीर खलफे) - शाळेत शालेय शिक्षण घेत असतानाच, शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत, शाळा परिसरातील एका शेतात जाऊन, भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेच्या वतीने मागील काही वर्षांपासून सातत्याने शेतीची लागवड करून कृतीयुक्त शिक्षण दिले जाते. त्यामुळे शाळेच्या वतीने आयोजित या अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चिखलात उतरून पारंपरिक पद्धतीने भाताची रोपे लावत शेती लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शहरी व आधुनिक जीवनशैलीमुळे आजची पिढी शेती आणि शेतकर्‍यांच्या कष्टापासून दूर जात आहे. विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्त्व कळावे आणि शेतीकामाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि नवनियुक्त केंद्रप्रमुख मिनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘कृषी अनुभूती उपक्रमाचे’ आयोजन करण्यात आले होते. यासाठी विनावापर असलेल्या शेतीचा उपयोग करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यासंदर्भात शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने संबंधित जमीन मालक महादेव धोपट यांच्याशी चर्चा करून शाळेच्या विद्यार्थ्यांना लावणी करण्यासाठी जमीन मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनीही लगेच जमीन देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पालकांनी सहकार्य करत शेतीची तयारी केली. यावेळी प्रगतशील शेतकरी मारुती कुर्टे आणि उदय रहाटे यांनी विद्यार्थ्यांना भात शेतीची माहिती दिली. तर शाळेतील शिक्षकांनी यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विकास योजनेची माहित देतानाच कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या बाबतही माहिती दिली. तसेच या उपक्रमांतर्गत विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी भात पीक तयार करण्यापासून ते चिखलणी आणि लावणी कशी करावी? याचे प्रात्यक्षिक उपस्थित पालकांकडून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने चिखलात उतरून गाणी गात भाताची लावणी केली. या उपक्रमातुन उत्पादन होणार्‍या धान्याचा उपयोग पूरक व पोषक आहार म्हणून वापर करण्यात येतो.

टाइम्स स्पेशल

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, अक्षरा शिर्के, मुकुंद घवाळी, शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, शिक्षिका पुनम कुलकर्णी यांच्यासह सर्वच पालकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg