loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील अधिकारी काम करत नसल्याचे महसूल मंत्र्यांसमोर आले स्पष्ट — गुरुदास गवंडे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान नागरिकांनी तब्बल १३५ निवेदने सादर केली. यातील जवळपास ९० टक्के प्रश्न हे जिल्हास्तरावरच निकाली निघू शकणारे असतानाही ते प्रलंबित राहिल्याने नागरिकांना थेट महसूल मंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली. ही बाब जिल्हा प्रशासनासाठी निश्चितच भूषणावह नसून, जिल्ह्यातील अधिकारी जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवत नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे, असा आरोप माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या. महसूल अधिकाऱ्यांनी दररोज तीन ते पाच तास जनतेच्या समस्या व प्रश्नांसाठी राखीव ठेवावेत, तसेच आठवड्यातून किमान एकदा कार्यालयाबाहेर पडून गावपातळीवर दौरे करावेत, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“माझ्या पुढील दौऱ्यात एकही प्रलंबित कामाचे निवेदन येता कामा नये. नागरिकांचे प्रश्न स्थानिक व जिल्हास्तरावरच मार्गी लावले जावेत,” अशा स्पष्ट शब्दांत महसूल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे गवंडे यांनी नमूद केले. सिंधुदुर्ग जिल्हा ‘पेपरलेस’ कारभारात अग्रेसर असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात महसूल यंत्रणा पूर्णपणे ढासळलेली असल्याचा आरोपही गवंडे यांनी केला. नागरिक विविध प्रश्न घेऊन महसूल कार्यालयात जातात; मात्र त्यांचे प्रश्न वेळेत मार्गी लागत नाहीत. अनेकदा नागरिकांना समाधानकारक उत्तर न देता तात्पुरती उत्तरे देऊन टाळाटाळ केली जाते. त्यामुळे सामान्य नागरिकांना वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “जिल्ह्यातील अधिकारी केवळ कागदावर काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्यक्ष कृती आणि परिणाम मात्र दिसून येत नाहीत. महसूल मंत्र्यांनाही जिल्ह्यातील जनतेच्या समस्या व प्रशासनातील त्रुटींची दखल घ्यावी लागली. यावरून जिल्ह्यात सर्वसामान्यांची कामे अपेक्षित गतीने होत नसल्याचे स्पष्ट होते,” असे गवंडे यांनी म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संबंधित विविध जमीन विषय व प्रकरणे अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. या पदावर आतापर्यंत अनेक अधिकारी कार्यरत राहिले आहेत. विशेषतः हेमंत निकम हे उपविभागीय अधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध जमीन विषयांची खातेनिहाय व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. “जनतेच्या समस्या केवळ कागदावर नोंदवून चालणार नाहीत; त्या प्रत्यक्षात सोडविण्यासाठी महसूल प्रशासनाने जबाबदारीने आणि परिणामकारकपणे काम करणे आवश्यक आहे,” असेही गवंडे यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg