loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात

रत्नागिरी : वर्धापनदिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा क्षण आहे. पुढील पाच वर्षांत कोणती उद्दिष्टे गाठायची याचा स्पष्ट आराखडा तयार केला पाहिजे. रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे. नव्या पिढीचा विचार करून संस्कृत भाषा, भारतीय ज्ञानपरंपरा आणि शाश्वत विकास यांना जोडणारे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी शासनाची मदत घेण्यात येईल. पदावरची व्यक्ती बदलली तरी संस्थेची दीर्घकालीन दिशा निश्चित असली पाहिजे, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले. भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अरिहंत मॉल (एसटी स्टॅंडसमोर), रत्नागिरी येथे रविवारी हा सोहळा उत्साहात पार पडला. उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाला मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्रा. कविता होले, वेद व व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्रा. हरेकृष्ण अगस्ती, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी तसेच रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉ. केतन चौधरी यांनी भारतीय संस्कृती ही निसर्गाचा ऱ्हास करणारी नसून पर्यावरण संवर्धनाची शिकवण देणारी संस्कृती असल्याचे सांगितले. संस्कृतीचे जतन म्हणजेच शाश्वत विकास असून त्यामध्ये भाषेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात ऋषींनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या कालावधीत मासेमारी टाळण्याची सूचना केली होती. या काळात माशांचे प्रजनन होत असल्याने पर्यावरण संवर्धनाचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. भारतीय ज्ञानपरंपरेतील अशा विचारांचा योग्य वेळी नव्या पिढीपर्यंत प्रसार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून रत्नागिरी येथे विश्वविद्यालयाचे उपकेंद्र सुरू झाले. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरीकर, संस्कृतप्रेमी, विविध संस्था व नागरिक यांच्या सहकार्यामुळे उपकेंद्राची यशस्वी वाटचाल शक्य झाली असून कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात उपकेंद्राचे परिसरात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

या वेळी नूतनीकृत योगभवनाचे लोकार्पण कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. येथे सुरू करण्यात आलेल्या निःशुल्क नियमित योगवर्गांमुळे रत्नागिरीकरांना सातत्यपूर्ण योगाभ्यासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात उपकेंद्राच्या पाच वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारी माहितीपट (डॉक्युमेंटरी) प्रदर्शित करण्यात आली. तसेच 'धर्मशास्त्रातील आंतरविद्याशाखीय संशोधन', 'कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान', आणि 'सनातन धर्म' या ग्रंथांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. अतुल वैद्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र आणि श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे उपस्थित होते. यावेळी प्रा. कविता होले, प्रा. हरेकृष्ण अगस्ती, डॉ. जयवंत चौधरी, डॉ. दिनेश रसाळ आणि डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आशिष बर्वे यांनी मनोगत व्यक्त करून उपकेंद्राच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले. कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg