loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोलीच्या वाहतूक कोंडीत अडकला ‘जीव’! सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा उपचाराअभावी मृत्यू

आंबोली, : आंबोलीतील वर्षा पर्यटनाचा शेवटचा शनिवार-रविवार पर्यटकांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी एका पर्यटकाच्या दुर्दैवी मृत्यूने गालबोट लागले. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाला अचानक सर्पदंश झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी हलविण्यात येत असताना आंबोलीतील प्रचंड वाहतूक कोंडी जीवघेणी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत पुढील उपचार मिळू न शकल्याने पर्यटकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर मरपा (वय ३८, रा. हंपी, कर्नाटक) हे कुटुंबीयांसह आंबोली धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या अंधार्‍या ठिकाणी ते धबधब्याचा आनंद घेत असताना अचानक सापाने चावा घेतल्याचे सांगण्यात येते. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक उपचाराची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यात आले; मात्र आंबोलीच्या मुख्य धबधबा परिसरात त्याचवेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने रुग्णाला पुढे नेण्यात प्रचंड अडथळे निर्माण झाले. तब्बल अडीच तास रुग्ण वाहतूक कोंडीत अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. वेळेवर उपचार मिळणे अत्यावश्यक असताना वाहतूक कोंडीमुळे झालेला विलंब अखेर जीवावर बेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आंबोलीतील वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्षा पर्यटनाच्या काळात आंबोलीत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात, हे प्रशासनाला माहीत असतानाही आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन का करण्यात आले नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेषतः रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी स्वतंत्र ‘इमर्जन्सी कॉरिडॉर’ किंवा वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे असताना प्रत्यक्षात आपत्कालीन वाहनांनाही वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याचे या घटनेने उघड केले आहे.

टाईम्स स्पेशल

पर्यटनाच्या हंगामात आंबोलीत होणारी वाहतूक कोंडी ही नवीन समस्या नाही. मात्र, या कोंडीमुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरही प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक आणि पर्यटकांकडून उपस्थित होत आहे. आंबोलीत पर्यटन वाढतेय; मात्र आपत्कालीन व्यवस्थेचे काय? पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ पोलिस बंदोबस्त पुरेसा आहे का? रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. एकीकडे आंबोलीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेतील त्रुटींमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येत असेल, तर या पर्यटन व्यवस्थेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाने आंबोलीतील वाहतूक व्यवस्थेचा कायमस्वरूपी आराखडा तयार करून आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग, धबधबा परिसरात तातडीची वैद्यकीय सुविधा आणि गर्दीच्या काळात प्रभावी वाहतूक नियमन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg