loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेवर निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद

नवी दिल्ली, - शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाला? या याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली. उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेवर निकाल देण्याचा अधिकारंच निवडणूक आयोगाला नव्हता. कारण निवडणूक आयोगाला पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की, लोकशाहीविरोधी हे ठरविणे निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे पक्ष आणि त्या पक्षाचे चिन्ह दुसर्‍या गटाला देण्याचा अधिकार आयोगाला नाही, असा जोरदार युक्तिवाद ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी आज केला. बुधवारीदेखील ही सुनावणी सुरू राहणार आहे. आपल्या युक्तिवादामध्ये एकूण २३ महत्वाचे मुद्दे कपिल सिब्बल यांनी सविस्तरपणे मांडताना निवडणूक आयोगाचे चार निर्णय कसे चूकीचे आहेत या विषयी युक्तिवाद केला. पक्षामध्ये दुसरा गट तयार होणं याचा अर्थ पक्षात फुट पडली, असा होत नाही असे सांगताना विधीमंडळ पक्षातील फूट ही राजकीय पक्षात पडलेली फूट असा अर्थ होत नाही, असे कपिल सिब्बल त्यांच्या युक्तीवादात म्हणाले. मंगळवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी पक्षात दुसरा गट तयार होणे म्हणजे पक्षात फूट पडणे नव्हे, असे सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाने केवळ विधीमंडळ पक्षातील फुटीवर आधारित निर्णय घेणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सिब्बल यांनी हा आदेश रद्द करण्याची मागणी केली. दुसरा गट तयार होणं म्हणजे पक्षात फूट पडली असा अर्थ होत नाही. सर्व निकालात फुटीबद्दल बोललं गेलं. मात्र विधीमंडळ गटाबद्दल बोललं गेलं नाही. निर्णय मात्र फक्त विधीमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला आहे, असा जोरदार युक्तिवाद करतानाच शिवसेना, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत पक्ष स्थापनेचा प्रयत्न करण्यात आला, याकडे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. सुनावणीच्या सुरुवातीलाच सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाची जोरदार चिरफाड केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मूळ पक्ष कोणता? विधीमंडळ पक्ष की राजकीय पक्ष? या मुद्द्यावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश सूर्यकांत, व्ही. मोहना आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचं अधिकारक्षेत्र, आयोगाने घेतलेले निर्णय आणि पूर्वीचे न्याय निवाडे याचा आधार घेत जोरदार युक्तिवाद केला. तसेच एखाद्या राजकीय पक्षात दुसरा गट तयार झाला म्हणजे त्या पक्षात फूट पडली असा त्याचा अर्थ होत नाही, असा दावा त्यांनी केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी दहाव्या अनुसूचीतील पूर्वीच्या परिच्छेद २ मधील अटीकडे लक्ष वेधले. प्रथम मूळ राजकीय पक्षात फूट पडणे आवश्यक होते. त्यानंतरच एक-तृतीयांश आमदार स्वतंत्र गट स्थापन करू शकत होते. या मुद्द्याचा विचार राणा प्रकरणात करण्यात आला होता. आमदार दोन भूमिका बजावतात, एक, मूळ राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून आणि दुसरी, विधिमंडळ पक्षाचे सदस्य म्हणून आणि एक-तृतीयांश आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानेच मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचे गृहीत धरता येईल, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. न्यायालयाने स्पष्ट केले की, येथे दोन स्वतंत्र अटी आहेत, पहिली अट म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडणे आणि दुसरी म्हणजे एक तृतीयांश आमदारांचा गट विधिमंडळ पक्षापासून वेगळा होणे. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणून मूळ राजकीय पक्षात स्वतंत्रपणे फूट पडल्याचे सिद्ध करण्याची गरज नाही, हा युक्तिवाद न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळला आहे. हाच तर्क येथेही लागू होतो. निवडणूक आयोगाने जे केले आहे, ते परिच्छेद ३ अंतर्गत निषिद्ध असलेल्या गोष्टीच करण्यासारखे आहे आणि ते या न्यायालयाने सुभाष देसाई प्रकरणात दिलेल्या निर्णयाच्या देखील विरोधात आहे, असं सिब्बल म्हणाले.

टाईम्स स्पेशल

राजकीय पक्षात विधिमंडळ पक्षाच्या फुटीच्या आधारेच फूट पडली, असा निष्कर्ष काढण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन निवाड्यांचा आधार घेतला. मात्र, यापैकी कोणताही निवाडा या भूमिकेला समर्थन देत नाही. पहिल्या प्रकरणात, दोन्ही गटांनी राज्य संचालन समितीमध्ये आपल्याला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता आणि आयोगाने संघटनात्मक पातळीवर पक्षात फूट पडल्याचे स्पष्टपणे नोंदवले होते. समाजवादी पक्षाच्या प्रकरणात, दोन्ही गटांनी राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदावर आपला दावा केला होता आणि आयोगाने पक्षामध्ये फूट स्पष्टपणे निर्माण झाल्याचे नोंदवले होते. त्यामुळे, सिंबॉल्स ऑर्डरच्या परिच्छेद १५ अंतर्गत केवळ विधिमंडळातील गटात फूट पडल्याच्या आधारावर निवडणूक आयोगाने अधिकारक्षेत्र गृहीत धरलेला हा आदेश बेकायदेशीर असून तो रद्द केला जाणे आवश्यक आहे. माझा हा युक्तिवाद योग्य ठरला, तर निवडणूक आयोगाने सुरुवातीपासूनच अधिकारक्षेत्र गृहीत धरण्याची केलेली कृती चुकीची होती आणि त्यानंतर त्यातून झालेली संपूर्ण कार्यवाहीही बेकायदेशीर ठरते, असंही त्यांनी सांगितलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg