loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारमाठ येथील तरुणाचा भूतान देशात अपघाती मृत्यू

मालवण, (प्रतिनिधी)- भूतान देशात पर्यटनासाठी गेलेला मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी शैलेश शिवाजी कांबळे (वय ३२) या तरुणाचा दि. ११ जुलै रोजी भूतान मधील वेंगडू झांपां ब्रिजवर मोटरसायकल अपघात होऊन ब्रिजच्या बाजूच्या नदीपात्रात कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भूतान देशाकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून कांबळे कुटुंबियांना शैलेश याच्या मृत्यूची माहिती देण्यात आल्यावर कांबळे कुटुंबियांनी भूतान येथे धाव घेतली होती. काही दिवसांनी शैलेश याच्या मृतदेहाचा शोध लागल्यानंतर ओळख पटविणे व विविध कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर शैलेश याचा मृतदेह कांबळे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. महिन्याभरानंतर १० ऑगस्ट रोजी भूतान येथेच शैलेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण कुंभारमाठ येथील रहिवासी आणि मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे सेवानिवृत्ती शिक्षक शिवाजी केरबा कांबळे (एस. के. कांबळे) यांचा मुलगा असलेला शैलेश शिवाजी कांबळे हा दि. १ जुलै २०२६ रोजी मालवण ते कलकत्ता व कलकत्ता येथून भूतान येथे सहलीसाठी गेला होता. त्याचा सहलीचा कालावधी ६ जुलै पर्यंत असा होता. मात्र भूतान येथे काही दिवस राहिल्यानंतर भूतान मधील साईड सीन पाहण्याच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या उद्देश्याने त्याने आपला मुक्काम ११ जुलै पर्यंत रीतसर परवानगी घेऊन वाढवला. याबाबतची कल्पना त्याने त्याच्या कुटुंबियांना मोबाईलवरून देताना आपण ११ जुलै रोजी भूतान वरून भारतात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र दि. ११ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांबळे कुटुंबियांना अत्यंत धक्कादायक व क्लेशदायक अशी माहिती प्राप्त झाली. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने मोबाईलवरून दिलेल्या माहितीनुसार शैलेश हा भूतानमध्ये भाड्याने घेतलेल्या दुचाकी गाडीने प्रवास करत असताना दि.११ जुलै रोजी सकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास शैलेश याचा अपघात होऊन तो वेंगडू झांपा ब्रिजवर पडल्याचे दुसर्‍या दिवशी निदर्शनास आले. सदर पूलाच्या जवळून नदी वाहत असल्याने त्या नदीच्या प्रवाहामध्ये तो पडल्याची माहिती कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच भूतान येथील वांगडू पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याचा शोध लागलेला नाही, असेही त्यावेळी प्रशासनाकडून कळविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या या माहितीमुळे कांबळे कुटुंबियांना मोठा धक्का बसून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघात ग्रस्त शैलेश सापडत नसल्याने संभ्रमावस्थेत सापडलेल्या कांबळे कुटुंबियांनी प्रशासनाला निवेदन सादर करत शैलेश याच्या भूतान मधील शोध कार्यासाठी आपल्या स्तरावरून भूतान अ‍ॅबेसीकडून जलद गतीने शोध कार्य करून आम्हास योग्य ते सहकार्य मिळावे अशी मागणी केली होती. शैलेश याच्या अपघाताची माहिती समजल्यावर त्याचे वडील शिवाजी कांबळे यांच्यासह नातेवाईकांनी भूतान येथे धाव घेतली. भूतान येथे शैलेश याचे शोध कार्य सुरु असताना काही दिवसांनी शैलेश याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृतदेहाची ओळख पटविण्याची कार्यवाही तसेच इतर कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कांबळे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर काल १० ऑगस्ट रोजी भूतान येथेच कांबळे कुटुंबियांकडून शैलेश याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शैलेश कांबळे हा कॉम्प्युटर इंजिनियर होता. त्याचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कुल येथे पूर्ण झाले होते. ऐन तारुण्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शैलेश याच्या अकाली मृत्यूमुळे मालवणमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg