loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचा कार्यभार चक्क परिविक्षाधीन अधिकार्‍याच्या हातात सोपविण्याचा धाडसी निर्णय, निर्णयाचे स्वागत आणि कुतूहल

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार हातात घ्यायला खाकी वर्दीतील धुरंदर आणि मुरब्बी अधिकार्‍यांचेही साडेतीन मूहूर्त पाहावे लागतात, त्याच जिल्ह्यातील सर्वात वर्दळीच्या आणि प्रतिष्ठीत ठाण्याची सूत्रे आता चक्क एका परिविक्षाधीन (शिकाऊ) अधिकार्‍याच्या हातात सोपवण्यात आली आहेत. रत्नागिरी पोलिसांच्या इतिहासात प्रथमच एका महत्त्वाच्या बदलाची नोंद झाली आहे. गेल्या २० ते २५ वर्षांत पहिल्यांदाच रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचा संपूर्ण कारभार एका परिविक्षाधीन (शिकाऊ) अधिकार्‍याकडे सोपवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित थोरात यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली असून, या निर्णयाने संपूर्ण जिल्ह्यात आश्चर्य आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहर पोलीस स्थानक हे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक कामाचा ताण आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाणारे महत्त्वाचे ठाणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या पोलीस स्थानकाचा कार्यभार पूर्ण अनुभवी अधिकार्‍यांकडेच दिला जात असे. परिविक्षाधीन अधिकार्‍यांना मात्र रत्नागिरी ग्रामीण, लांजा किंवा संगमेश्वर यांसारख्या तुलनेने कमी ताण असलेल्या पोलीस ठाण्यांची जबाबदारी दिली जात होती. मात्र, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एक धाडसी निर्णय घेत प्रथमच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे नियंत्रण थेट एका शिकाऊ अधिकार्‍याच्या हातात सोपवले आहे. अधीक्षक बगाटे यांचा हा प्रयोग अत्यंत धाडसी मानला जात असून, या निर्णयाने पोलीस दलात नवीन चर्चांना उधाण आले आहे. अभिजित थोरात यांच्यासमोर या पदावर रुजू होताच अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील विविध आंदोलने, आगामी गणेशोत्सव आणि महत्त्वाच्या मंत्र्यांचे दौरे यांसारखे मोठे बंदोबस्त अवघ्या काही दिवसांत पार पाडावे लागणार आहेत.

टाईम्स स्पेशल

शहर पोलिसांवरील ताण प्रचंड असताना, अभिजित थोरात या आव्हानांना कसे तोंड देतात आणि कायदा व सुव्यवस्था कशी राखतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी शहर हे व्यावसायिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्याने येथे रोजचे लहान-मोठे प्रश्न सोडवणे मोठे कौशल्याचे काम असते. अशा वेळी एका तरुण व शिकाऊ अधिकार्‍याने या गुंतागुंतीच्या ठाण्याचा ताबा घेणे ही साधी बाब नाही. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलेला हा प्रयोग रत्नागिरीच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी किती यशस्वी ठरतो, हे येणारा काळच ठरवणार आहे. अभिजित थोरात आपल्या पहिल्याच मोठ्या असाइनमेंटमध्ये कशी कामगिरी बजावतात, याविषयी सध्या नागरिकांमध्ये आणि पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg