loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाची सर अन कोवळे उन त्यात चोहीकडे हिरवळ , श्रावण हा महिना आहेच तसा. कोणालाही आवडेल असा आल्हाददायक !

‘‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’’ बालकवी यांचे हे अजरामर काव्य मन मोहून टाकते. श्रावण! श्रावण हा महिना आहेच तसा. कोणालाही आवडेल असा आल्हाददायक! प्रसन्न! या महिन्यात पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगीबेरंगी फुलांची वेलबुट्टी धारण केलेली असते. श्रावणात निसर्ग रमणीय रूप धारण करतो. झाडे, वेली, वने ही टवटवीत बनून, सुहास्य वदनाने डोलत असतात. जिकडे पहावे तिकडे हिरव्या रंगाचे चैतन्य पसरलेले असते. हिरव्या रंगाच्या विविध छटा वातावरणात लहरत असतात. हे पाहून असे वाटते की, धरती माता जणू आपल्या भोवती हिरवे सुखच लपेटून घेत आहे. या महिन्यात पाऊस धो-धो न पडता सरींच्या रूपात पडतो. म्हणूनच आपण त्याला ‘श्रावणसरी’ असे म्हणतो. मध्येच ऊन मध्येच पाऊस असे वातावरण असते. मध्येच कधी आकाशात सप्तरंगाचे म्हणजे इंद्रधनुष्याचे दर्शन घडते.( ratnagiri times )

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रावण महिना हा विशेष करून, भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो. अभिषेक, पठण, होमहवन, उपवास, व्रत केले जातात. त्यामध्ये निराहार व्रत, एकान्नव्रत, नक्त व्रत, मौन व्रत, कर्पूरहोम, दानधर्म, सतसंकल्प केले जातात. या महिन्यात मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर अखंड संततधार सुरू असते. परमेश्वराची आराधना करण्याच्या प्रेरणेमुळे श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना बनला आहे.या महिन्यात शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांना विशेष महत्त्व आहे. लोक लांबून-लांबून या ठिकाणी आवर्जून दर्शनाला येतात. आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धी मिळावी, शरीरस्वास्थ्य चांगले राहावे, अशी देवाकडे प्रार्थना करतात. नवीन लग्न झालेल्या मुलींना ‘श्रावण महिना’ ही आनंदाची पर्वणीच असते. श्रावण सोमवारी ’शिवामूठ’ वाहून, मंगळवारी मंगळागौरीचे पूजन ती करते.एका चौरंगावर अन्नपूर्णा देवीची स्थापना करून, तिला विविध पानाफुलांनी सजवून तिची पूजा केली जाते. देवीची आरती करून कहाणी वाचली जाते. ही पूजा नवीन लग्न झालेल्या स्त्रिया, आपल्या नवीन लग्न झालेल्या मैत्रिणींसह एकत्रितपणे पाच वर्ष श्रावण मंगळवारी करतात. दुपारी नेवैद्याला पाच पक्वान्ने असतात. त्या दिवशी महिलांना हळदी-कुंकवाला बोलावून रात्री फुगडी, झिम्मा यासारखे विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. नागपंचमी या दिवशी नागोबाला भाऊ मानून नागाची प्रतिमा चंदनाने पाटावर काढून, फुलोरा घालून, दूध व लाह्याचा नेवैद्य दाखवितात. ‘‘सदैव माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहा’’, अशी प्रार्थना स्त्रिया करतात. रात्री सर्व स्त्रिया एकत्र जमून फुगडी, झिम्मा असे खेळ खेळतात. या खेळामध्ये वयोवृद्ध महिलाही हिरीरीने भाग घेतात. संसाराचा हा रथ चालविताना सदैव तत्पर राहण्याच्या यशाचे खेळ हेच महिलांचे गमक असते. ratnagiri times

टाइम्स स्पेशल

श्रावण महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व आहे. हा महिना माणसातील भूतदया जागवितो, म्हणूनच श्रावणात नागाची देखील पूजा होते. श्रावण पौर्णिमेला भावाला राखी बांधून, सागराची पूजा करून नारळ वाहिला जातो. बहीण-भावातील प्रेमाचे नाते रक्षाबंधनाने अधिक घट्ट करण्याचे काम श्रावणच करतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस ‘गोकुळाष्टमी’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतकरी श्रावण महिना सरता सरता आपल्या कष्टाळू सहकार्‍यांची म्हणजेच बैलांची पूजा करतात. अशा या श्रावण महिन्याने लेखक, कवींना मोहित केले नसते, तरच नवल! कुसुमाग्रज यांना तर हा श्रावण ‘‘हसरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजरा’’ असा वाटतो. ‘‘असा हा श्रावण महिना, किती वर्णावा त्याचा महिमा!’’ मन, बुद्धी, देहाला प्रफुल्लित करणारा, आनंदाने डोलायला लावणारा, पारंपरिक रितीरिवाज जोपासणारा, सांस्कृतिक लोकगीत, खेळांची शाश्वत मूल्य जपायला शिकविणारा असा हा महिना सर्वांनाच हवाहवासा वाटतो. ratnagiri times

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg