loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उबाठा) पक्षाचा तीव्र विरोध; 'आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा'

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावित स्वतंत्र सार्वजनिक परिवहन सेवेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी महापालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर करत, शहरातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली आहे. या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचा निर्णय नागरिकांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवेदनात पनवेल शहरातील अनेक भागांमध्ये अद्यापही नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शाश्वत पाणीपुरवठा, सक्षम वितरण व्यवस्था आणि आवश्यक नागरी सुविधा उभारण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक रस्ते अरुंद असून पार्किंगची सुविधा अपुरी आहे. वाढती वाहने, शाळांच्या बसेस आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बससेवेचे नियोजन कसे केले जाणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेनेने प्रशासनाकडे बस डेपो, पार्किंगची जागा, प्रस्तावित बसमार्ग, बससंख्या, चालक-वाहकांची नियुक्ती, आर्थिक नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच आपत्कालीन वाहनांना मार्ग कसा उपलब्ध करून दिला जाणार, याबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटी बससेवेचा विस्तार हा अधिक व्यवहार्य पर्याय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पनवेल आणि नवी मुंबई महापालिकांनी परस्पर समन्वय साधून एनएमएमटी सेवा शहरातील अधिक भागांपर्यंत वाढवावी. त्यामुळे नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल आणि पनवेल महापालिकेवर स्वतंत्र परिवहन व्यवस्था उभारण्याचा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भार पडणार नाही, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. स्वतंत्र परिवहन सेवा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च, बस खरेदी, डेपो, इंधन, देखभाल, प्रशासकीय कर्मचारी, तांत्रिक यंत्रणा आणि वार्षिक महसुली खर्च करावा लागणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या परिवहन उपक्रमांना आर्थिक तोटा होत असल्याचा दाखला देत, अशा परिस्थितीत पनवेल महापालिकेने हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व आर्थिक बाबींचा सखोल अभ्यास करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नये, तसेच स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने स्थगित करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. "आधी पाणी द्या, आधी रस्ते सक्षम करा, आधी पार्किंगची समस्या सोडवा आणि त्यानंतर परिवहन सेवेचा विचार करा," अशी भूमिका निवेदनातून स्पष्ट करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वतंत्र परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय पुढे रेटल्यास महापालिका कार्यालयावर मोर्चा, धरणे आणि टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी दिला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg