loader
Breaking News
Breaking News
Foto

बेळगावसह सीमाभागातील ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घ्या; रामदास कदमांची पंतप्रधानांकडे मागणी

खेड (दिलीप देवळेकर) :- बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी आणि निपाणी या सीमाभागातील मराठी भाषिकांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असल्याचा आरोप करत, हा संपूर्ण भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. सीमाभागातील सुमारे ४० लाख मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी कदम यांनी केली आहे. १९६० मध्ये भाषावार प्रांतरचना झाली, त्यावेळी बेळगावसह कारवार, धारवाड, हुबळी आणि निपाणी परिसरात मोठ्या संख्येने मराठी भाषिक असूनही हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला नाही. चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाल्यामुळे मराठी भाषिकांचा हा भाग महाराष्ट्राबाहेर राहिल्याचा आरोप कदम यांनी केला. तेव्हापासून सीमाभागातील जनता सातत्याने महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. सीमाभागातील मराठी शाळा बंद करणे, मराठी शिक्षकांना हटवणे, मराठी पाट्या काढून टाकणे तसेच बेळगावचे नाव बदलून ‘बेळगावी’ करण्यात आल्याचा आरोपही कदम यांनी केला. मराठी मुलांना कन्नड भाषा सक्तीने शिकावी लागत असून, मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले. सीमाप्रश्नावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषिकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली होती. २००६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव येथे आयोजित सभेला आपण उपस्थित राहिलो होतो. या सभेत भाषण केल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या गुन्ह्याची माहिती आपल्याला अनेक वर्षे देण्यात आली नाही, असा दावा कदम यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर २००९ मध्येही आपण बेळगावला गेलो होतो. मराठी भाषिकांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना हद्दपार करा, असे आपण त्या वेळी भाषणात म्हटले होते. तसेच भाजपकडून मराठी माणसावर अन्याय झाल्यास महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती तोडण्याची वेळ येईल, हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेशही आपण सभेत दिल्याचे कदम यांनी सांगितले. २०१० मध्ये बेळगावच्या काळ्या दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो असताना सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यावेळी टेबलावर उभे राहून भाषण केले, तरीही आपल्याला अटक करण्यात आली नाही किंवा गुन्ह्याची कल्पना देण्यात आली नाही, असे कदम यांनी सांगितले. २००६ मध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असताना आणि त्यानंतर पर्यावरणमंत्री म्हणून काम करत असतानाही आपल्याला कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. मात्र, २०११ मध्ये अचानक आपल्या गावातील घरावर ‘वॉन्टेड’ असल्याचे लेबल लावण्यात आले आणि हजर न झाल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आल्याचा दावा कदम यांनी केला. या प्रकरणात बेळगाव न्यायालयात हजर झाल्यानंतर १० लाख रुपयांचा जामीन द्यावा लागला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते यशवंत बिरजे आणि त्यांच्या वडिलांनी आपल्याला जामीन दिल्याचे कदम यांनी सांगितले. २००६ मधील सभेला उपस्थित असलेले नितीन बानगुडे पाटील यांनाही या प्रकरणात वॉन्टेड दाखविण्यात आले होते. तब्बल १३ ते १४ वर्षांनंतर घरावर नोटीस लावल्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

टाईम्स स्पेशल

कर्नाटक पोलिसांनी राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत, आपल्या भाषणातील शब्दांचा विपर्यास करून प्रक्षोभक भाषणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कदम यांनी म्हटले. या प्रकरणात वकील श्यामसुंदर बट्ट्याळ यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. अनेक साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षकांचीही उलटतपासणी झाली. अखेर ११ तारखेला न्यायालयाने रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालाबद्दल कदम यांनी न्यायदेवतेचे मनापासून आभार मानले. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून केंद्र सरकारने मनावर घेतल्यास या प्रश्नावर लवकर निर्णय होऊ शकतो, असा दावा रामदास कदम यांनी केला. केंद्रात शिवसेना-भाजपची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी त्यांनी विनंती केली आहे. भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी भाषिकांचा मोठा भाग महाराष्ट्राबाहेर राहिला असेल, तर त्यांना वेगळा न्याय का, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी आणि निपाणी हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय द्यावा, यासाठी पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg