loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदारकीसाठीच निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदे सेनेतून निवडणूक लढवली, वैभव नाईक यांचा पलटवार

कणकवली (प्रतिनिधी)- गद्दारी करून मला आमदारकी नको होती. माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला अनेकवेळा शिंदे गटात येण्यासाठी बोलावले होते. पण निष्ठा सोडली नाही, असा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी आम. निलेश राणे यांना लगावला आहे. केवळ आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदे सेनेतून निवडणूक लढवली, असा आरोपही वैभव नाईक यांनी केला. आम.निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार उत्तर दिले आहे. कुडाळ-मालवणच्या राजकारणात नाईक-राणे संघर्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कुडाळ-मालवण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार होते, असा दावा आमदार निलेश राणे यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. निलेश राणेंच्या या दाव्याला वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, ‘गद्दारी करून मला आमदारकी नको होती. माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता,’ अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकनाथ शिंदे यांनी आपल्याला अनेकवेळा शिंदे गटात येण्यासाठी बोलावले होते, असा दावा वैभव नाईक यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर दसरा मेळाव्यापर्यंतही मंत्री भरत गोगावले यांनी आपल्याला फोन केला होता आणि ही बाब भरत गोगावले यांनीही मान्य केली असल्याचे नाईक यांनी सांगितले. मात्र, आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची निष्ठा सोडली नाही. आमदारकी मिळवण्यासाठी पक्ष बदलण्यापेक्षा निष्ठेला प्राधान्य दिले आणि त्यासाठी आमदारकीही गमावली, असे नाईक यांनी म्हटले आहे. निलेश राणे यांच्यावर टीका करताना वैभव नाईक म्हणाले , ‘निलेश राणे यांना आणि त्यांच्या वडिलांची पक्षातून काढून टाकण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी काय वक्तव्य केले होते, हेही त्यांनी लक्षात ठेवावे.’ तसेच केवळ आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून निलेश राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिंदे सेनेतून निवडणूक लढवली, असा आरोपही नाईक यांनी केला. आपल्या पराभवाबाबत बोलताना नाईक यांनी निलेश राणे यांच्या विजयावरही भाष्य केले. ‘निलेश राणे सात हजार आठशे मतांनी निवडून आले. मात्र नारायण राणे किंवा सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी लोकांच्या घरी जाऊन प्रचार केला नसता आणि रवींद्र चव्हाण यांनी पैसे खर्च केले नसते, तर ते निवडून आले नसते,’ असा दावा वैभव नाईक यांनी केला.

टाईम्स स्पेशल

‘माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आला हे तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. आता तुमच्या आमदारकीला दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत तुम्ही काय काम केले आणि लोकांना काय दिले, हे सांगणे महत्त्वाचे आहे,’ असा टोला नाईक यांनी लगावला. आपण निष्ठावंत राहिल्याचा काही जणांना राग येत असेल, मात्र निष्ठेसाठी काहीतरी गमवावे लागते आणि त्यासाठी आपण आमदारकी गमावली, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटातील अनेक आमदार त्यावेळी आपले मित्र होते आणि त्यांनीही आपल्याला शिंदे गटात येण्याचे आवाहन केले होते. आजही शिंदे गटात येण्याचे निमंत्रण मिळत असल्याचा दावा नाईक यांनी केला. ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहणार आहे,’ असे सांगत नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, निलेश राणे भविष्यात शिंदे सेनेला सोडून पुन्हा भाजपमध्ये जातील आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवतील, असा अंदाजही वैभव नाईक यांनी व्यक्त केला. ‘तुम्ही आता शिंदे सेनेत आहात, तर शिंदे सेनेबरोबरच राहा,’ असा सल्लाही त्यांनी निलेश राणे यांना दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg