loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गमध्ये २५ ऑक्टोबरला ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबईच्या कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुका शाखा आणि गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोडामार्ग तालुक्यात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच या सोहळ्याचे आयोजन होत असल्याने हा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळा ठरावा, यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनासाठी रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, सावंतवाडी येथे महासंघाच्या संबंधित शाखांची संयुक्त बैठक पार पडली. केंद्रीय अध्यक्ष व्ही. ए. कदम आणि दोडामार्ग शाखेचे सल्लागार रमाकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सामाजिक परिवर्तन, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतावादी विचारांची प्रेरणा देणारा महत्त्वाचा दिवस आहे. या विचारांचा जागर करत यंदाचा सोहळा दोडामार्ग तालुक्यात व्यापक सहभागाने साजरा करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर, प्रमुख पाहुणे, वक्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा झाली. कार्यक्रमाचा सविस्तर आराखडा, आयोजनाचे स्वरूप, विविध समित्यांच्या जबाबदाऱ्या आणि उपस्थित धम्म बांधवांसाठी आवश्यक व्यवस्था याबाबतही प्राथमिक नियोजन करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यात प्रथमच हा कार्यक्रम होत असल्याने तालुक्यातील प्रत्येक शाखेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी या सोहळ्याला आपली सामाजिक जबाबदारी मानून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने धम्म बांधव उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन व्यापक पातळीवर करण्यात येणार आहे. बैठकीस सावंतवाडी अध्यक्ष टिळाजी जाधव, कुडाळ अध्यक्ष अनिल पावसकर, दोडामार्ग अध्यक्ष शंकर जाधव, सचिव संदीप जाधव, वेंगुर्ला उपाध्यक्ष गजानन जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठल जाधव, सावंतवाडी उपाध्यक्ष अमित जाधव, सावंतवाडी सदस्य महेंद्र सावंत, वासुदेव जाधव तसेच दोडामार्ग शाखेचे सदस्य कृष्णा कदम आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष व्ही. ए. कदम आणि दोडामार्ग शाखेचे सल्लागार रमाकांत जाधव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन करताना सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शाखांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या पुढील नियोजनासाठी रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता दोडामार्ग येथे रमाकांत जाधव यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबईच्या कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुका शाखा तसेच गोवा विभागातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले आहे. “७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन — समतेच्या विचारांचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संकल्प” या भावनेतून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg