loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळुणात दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरु; ऋणातून उतराई झालो! न्यायमूर्ती माधव जामदार

चिपळूण, (ओंकार रेळेकर): चिपळूण येथे नूतन दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या स्थापनेमुळे तालुक्याच्या न्यायिक व्यवस्थेत महत्त्वाची भर पडली आहे. या न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना न्यायमूर्ती जामदार यांनी चिपळूणशी असलेले आपले जुने नाते, पूर्वजांचा चिपळूणशी असलेला संबंध आणि चिपळूणचा सुपुत्र म्हणून या न्यायालयाच्या स्थापनेचा आपल्याला विशेष आनंद असल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर, जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विनोद जाधव, चिपळूणचे नवनियुक्त दिवाणी न्यायाधीश गौतम दिवाण, चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन सावंत यांच्यासह न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना न्यायमूर्ती माधव जामदार म्हणाले, चिपळूण तालुक्यातील एका गावातून सुमारे दीडशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज पुण्याला गेले. माझे वडील न्यायाधीश होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरण्याची संधी मला मिळाली. मात्र चिपळूणशी असलेले माझे नाते कायम राहिले. मी चिपळूणचा, पुण्याचा आणि बारा गावचे पाणी प्यायलो आहे, असे सांगत त्यांनी चिपळूणशी असलेला आपला जिव्हाळा अधोरेखित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूणचा सुपुत्र म्हणून या भूमीत दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगताना न्यायमूर्ती जामदार म्हणाले, चिपळूणचा सुपुत्र असल्याने आज येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय झाले आहे. त्यामुळे मी एका अर्थाने ऋणातून उतराई झालो आहे. चिपळूण तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. चिपळूणमध्ये दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू झाल्यामुळे तालुक्याच्या न्यायिक व्यवस्थेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले असल्याचे न्यायमूर्ती जामदार यांनी सांगितले. चिपळूणमध्ये तालुका स्तरावरची आज सर्व न्यायिक व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे. ही व्यवस्था केवळ चिपळूण शहरातील नागरिकांसाठी नाही, तर संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी प्रवास करताना येणार्‍या अडचणींचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. अनेक गावांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित आहे. काही गावांमध्ये दिवसातून एकच एसटीची फेरी असते. सर्व नागरिकांकडे खासगी वाहने उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत न्यायालयीन कामासाठी दुसर्‍या ठिकाणी जाणे पक्षकारांसाठी अडचणीचे ठरू शकते.

टाईम्स स्पेशल

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोकण ही परशुरामाची भूमी आहे. परशुरामांचे धैर्य, धाडस आणि बुद्धिमत्ता यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोणताही वाद न्यायालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सामोपचाराने सोडविण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. न्यायालयीन प्रक्रियेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मध्यस्थी आणि परस्पर सामंजस्याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ वकिलांनी तरुण वकिलांना याबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन सावंत यांनी केले. चिपळूणमध्ये दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची आवश्यकता, त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि या प्रक्रियेत विविध व्यक्ती व संस्थांकडून लाभलेले सहकार्य याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अ‍ॅड. हर्षद भडभडे यांच्यासह न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अ‍ॅड. नयना पवार यांनी मांडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg