loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वरूप संगीत विद्यालयाच्या वतीने आज संध्याकाळी देवरुख येथे गुरुवंदना कार्यक्रम

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - स्वरूप संगीत विद्यालयाचे संस्थापक तथा ज्येष्ठ तबला वादक आणि संगीत शिक्षक गिरीधर शरद कुलकर्णी यांच्या गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता लोकमान्य वाचनालय हॉल, मातृमंदिर चौक, देवरूख येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्वरूप संगीत विद्यालय विद्यार्थी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. गिरीधर कुलकर्णी हे गेली अनेक वर्षे तबला वादन, संगीत शिक्षण आणि चित्रकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून त्यांनी रसायनशास्त्र विषयात बी.एस्सी. तसेच तबला वादनातील इन्स्ट्रुमेंटल म्युझिक डिप्लोमा पूर्ण केला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज येथून त्यांनी ‘संगीत अलंकार’ ही पदवी प्राप्त केली असून आकाशवाणीचे ‘ए’ ग्रेड मान्यताप्राप्त कलाकार म्हणूनही त्यांनी लौकिक मिळविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांना स्व. गोविंदराव माजगावकर, अमोद दांडगे तसेच प्रसिद्ध कलाकार पं. अरविंद मुळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागात १९९८ ते २००५ या कालावधीत त्यांनी तबला साथसंगतकार म्हणून काम केले. सध्या ते देवरूख ललित कला अकादमीमध्ये व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी देशातील विविध नामवंत संगीत महोत्सवांमध्ये तबला साथसंगत तसेच स्वतंत्र वादन सादर केले आहे. मुंबईतील एन.सी.पी.ए., स्वर साधना संगीत समारोह, वास्को येथील दामोदर संगीत समारोह, मिरज येथील उस्ताद अब्दुल करीम खान संगीत महोत्सव, कोल्हापूर येथील घराना संमेलन, गायन समाज देवल क्लब, देवरूखचा स्वरउत्सव, गोवा कला अकादमी, बेळगाव येथील अकादमी ऑफ म्युझिक, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर यांसह अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर त्यांनी आपल्या तबला वादनाची छाप उमटविली आहे. त्यांनी पं. विनायक तोरवी, आशा खाडिलकर, श्रुती सडोलीकर- काटकर, पं. प्रभुदेव सरदार, डॉ. सुधांशू कुलकर्णी, राजा काळे, नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे, जयतीर्थ मेउंडी, पं. विजय कोपारकर, पं. रघुनंदन पानशिकर, संदीप आपटे, उस्ताद छोटे रहिमत खान आदी नामवंत कलाकारांना तबल्याची साथ केली आहे. ‘साम’ मराठी वाहिनीवरील कार्यक्रम तसेच ‘ऋतू-मल्हार’ या राग मल्हारावर आधारित कार्यक्रमातही त्यांनी तबला साथ दिली आहे.

टाईम्स स्पेशल

तबला वादनाबरोबरच कुलकर्णी हे उत्तम लँडस्केप चित्रकार म्हणूनही कार्यरत आहेत. जलरंगाच्या माध्यमातून त्यांनी अनेक निसर्गचित्रे साकारली आहेत. महान चित्रकार व अभिनेते स्व. चंद्रकांत मांढरे तसेच लँडस्केप कलाकार एस. निंबाळकर यांचे चित्रकलेचे मार्गदर्शन त्यांना लाभले. संस्कार भारती मिरज, बालगंधर्व पुणे, भीमा फेस्टिव्हल कोल्हापूर, रंग-बहार कोल्हापूर आदी ठिकाणी त्यांनी चित्रकला प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये सहभाग घेतला आहे. कोल्हापूर, पुणे, मिरज आणि मुंबई येथील विविध कलादालनांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरविण्यात आली आहेत. गुरुवंदना कार्यक्रमात दीपप्रज्वलन व सत्कार, गुरुपूजन, विद्यार्थ्यांचे तबला वादन तसेच गिरीधर कुलकर्णी यांचे तबला वादन होणार आहे. यानंतर कोल्हापूरचे गायक नितीन मुनीश्वर यांचे गायन होणार असून तबला साथ गिरीधर कुलकर्णी आणि संवादिनी साथ अमित साळोखे करणार आहेत. संगीत क्षेत्रातील साधना, गुरूंचे संस्कार आणि विद्यार्थ्यांमध्ये संगीताची गोडी निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या गिरीधर कुलकर्णी यांच्या गुरुवंदना सोहळ्यास संगीतप्रेमी, विद्यार्थी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरूप संगीत विद्यालय विद्यार्थी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg