loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोलकर हत्या प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाई करा; अंनिसची तहसीलदारांकडे मागणी

खेड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेड शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, तसेच प्रकरणातील प्रलंबित कायदेशीर बाबींवर शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी १३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे होता. तपासानंतर या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. मात्र, हत्येमागील सूत्रधारांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने अंनिसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. दाभोलकर यांची हत्या त्यांच्या विचारांना संपविण्यासाठी केलेला सुनियोजित कट असल्याचे पुणे सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदविले असतानाही या कटामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाकडून अपेक्षित प्रयत्न होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणांमध्येही सूत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याने विवेकवादी कार्यकर्त्यांमध्ये कायम भीतीचे वातावरण असल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच दाभोलकर हत्या प्रकरणातील वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची झालेली सुटका याविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात अद्याप दाद मागितलेली नाही. ही बाब गंभीर असून, सीबीआयने तातडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला असून, या कायद्यांतर्गत राज्यात दोन हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटक आणि गुजरातमध्येही जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. देशभरात वाढत असलेल्या बुवाबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर जादूटोणाविरोधी कायदा लागू करावा, अशी तिसरी मागणी समितीने केली आहे. या तीनही मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेड शाखेने केली आहे. निवेदनावर शाखेचे अध्यक्ष मोहन रा. चव्हाण, कार्याध्यक्ष प्रशांत नि. पावसकर आणि प्रधान सचिव समीर धो. पाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg