loader
Breaking News
Breaking News
Foto

मच्छी वाहतुकीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याने ११ अपघात; विठ्ठलवाडीकरांचा प्रशासनाला जाब, बंदिस्त टँकरमधून वाहतुकीची मागणी

देवगड (प्रतिनिधी) - देवगड जेटीवरून मच्छी वाहतूक करणार्‍या वाहनांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या पाण्यामुळे रस्ते निसरडे होऊन आतापर्यंत ११ अपघात घडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक वाहनचालकांना दुखापत झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने विठ्ठलवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाची संयुक्त बैठक विठ्ठलवाडी मंदिरात आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी ग्रामस्थांनी तहसीलदार, मत्स्य विभाग, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला निवेदन देऊन मच्छी वाहतुकीदरम्यान रस्त्यावर सोडण्यात येणारे पाणी रोखण्याची मागणी केली होती. मात्र, परिस्थितीत बदल झालेला नाही. संबंधित वाहनचालकांकडे विचारणा केली असता उद्धट उत्तरे मिळत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीला नगराध्यक्ष साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे, वैशाली कदम, स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती तारी, विलास रूमडे, संतोष पाटणकर, वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांच्यासह जगतापवाडी, मुस्लिमवाडी, विठ्ठलवाडी आणि किल्ला परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याचे सांगितले. नगरपंचायत प्रशासन ग्रामस्थ आणि संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तर मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी संबंधित मच्छी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना आवश्यक सूचना देऊन मानवी वस्ती आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट केले. ग्रामस्थ अनिल कोरगावकर यांनी व्यवसायाला आमचा विरोध नाही; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड चालणार नाही, अशी भूमिका मांडली. मच्छी वाहतूक करणारी वाहने बंदिस्त टँकरमधून न्यावीत आणि रस्त्यावर पाणी सोडणे तातडीने बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली. देवगड बाजारपेठ आणि किल्ला परिसरात पर्यटकांची वर्दळ असताना दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अपघातांसह आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

देवगडमधील स्थानिक मच्छीमारांच्या गाड्या बंदिस्त स्वरूपाच्या आहेत. मात्र, मालवण परिसरातून येणार्‍या काही वाहनांमधून पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत होणार्‍या वाहतुकीचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा. ग्रामस्थांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला वैभव बिडये, अवी खडपकर, विनायक पारकर, विपुल जाधव, अभिराज जोशी, किरण पाटील, सुधीर भाबल, सुभाष देवगडकर, ज्ञानेश्वर खवळे, आनंद कुलकर्णी, इकबाल शेख, महेंद्र खडपकर, सदानंद जोशी, वैशाली कदम, रघुनाथ कोरेगावकर, धनंजय वाडेकर, अभिषेक शिरसाट, प्रणित मांजरेकर, विजय पाटकर, महेंद्र पारकर, पप्पू कदम, सतीश खानविलकर, स्वप्निल पारकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg