loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साज

खेड (प्रतिनिधी) - भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची क्षितिजे विस्तारावीत आणि पुस्तकांच्या माध्यमातून प्रेरणादायी विचार आत्मसात करावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व-माध्यमिक विभागप्रमुख देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची, शैक्षणिक वाटचालीची, संघर्षाची आणि राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाची माहिती प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या जीवनातील जिद्द, प्रचंड मेहनत, ज्ञानाची ओढ आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ या गुणांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात घ्यावा, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सारिका तटकरी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पुस्तकांचे वाचन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकास, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचे प्रभावी साधन आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घेत ज्ञानसमृद्ध जीवनाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या ग्रंथपाल सिद्धी दामले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यानिमित्ताने शाळेच्या ग्रंथालयातर्फे वाचनाची आवड जोपासणाऱ्या आणि उत्कृष्ट वाचक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा पुस्तकरूपी भेट देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कोमल कासार (इयत्ता दहावी), मानवी उपाध्ये (इयत्ता दहावी), जिया चव्हाण (इयत्ता नववी) आणि अनन्या कानडे (इयत्ता आठवी) यांचा समावेश होता. या गौरवामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळाली आणि पुस्तकांशी मैत्री अधिक दृढ करण्याचा संदेश मिळाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई कदम हिने प्रभावीपणे केले. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg