loader
Breaking News
Breaking News
Foto

आयुष्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी: उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या इशारा

ठाणे,दि.18(प्रतिनिधी) :- केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे आणि विनामूल्य उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा उपचारासाठी मज्जाव करणाऱ्या खासगी रुग्णालयांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिला आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, किरण भोईर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.धीरज महांगडे, डॉ.अर्चना पवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्र आरोग्य अधिकारी डॉ.अंजली चौधरी, प्रादेशिक व्यवस्थापक डॉ.श्रीकांत पुंडकर, वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉ.रवींद्र जगतकर, आरोग्य अधिकारी, आयुष्यमान भारत मिशन चे जिल्ह्यातील समन्वयक आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत रुग्णालयांसमोरील अडचणी, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण तक्रारी तसेच योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर सखोल चर्चा करण्यात आली. शासकीय योजनांचे फलक दर्शनी भागात न लावणाऱ्या आणि आढावा बैठकीला कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिलेल्या खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश डॉ. शेटे यांनी दिले असून, नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या अशा रुग्णालयांची देयके तात्काळ रोखण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीदरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी काही मोठ्या रुग्णालयांकडून योजनेची माहिती देणारे फलक प्रमुख ठिकाणी लावले जात नसल्याचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे उपस्थित केला. अनेक खासगी रुग्णालये आयुष्मान कार्डधारक रुग्णांना उपचारांसाठी प्राधान्य देत नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता संपूर्ण यंत्रणा ऑनलाइन आणि पारदर्शक केली असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते २६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुभारंभ झालेल्या अत्याधुनिक 'टीएमएस २.०' (TMS 2.0) पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी विनाकारण नकार देणे किंवा क्लेम प्रक्रियेत गैरप्रकार करणे शक्य राहिलेले नाही, कारण प्रत्येक व्यवहाराची पारदर्शक नोंद होत आहे.उपचारांच्या पूर्वमंजुरीसाठी प्रशासनाने केवळ सहा तासांची कालमर्यादा निश्चित केली असून, या ठराविक मुदतीत संबंधित क्लेम मंजूर किंवा नामंजूर न झाल्यास नियमानुसार त्याला स्वयंचलित मान्यता (Auto Approval) मिळण्याची पारदर्शक तरतूद करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

रुग्णालयांनी तांत्रिक प्रक्रिया आणि कागदपत्रपूर्ती वेळेत केल्यास निधी मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. दरम्यान, रुग्णालयांना क्लेमच्या रकमेपैकी केवळ २५ ते ३० टक्केच रक्कम मिळते, असा दावा काही घटकांकडून केला गेला असला, तरी अधिकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. या सर्व कल्याणकारी योजनांच्या जनजागृतीबाबत ठाणे जिल्ह्याची सद्य:स्थिती पाहता, जिल्ह्यात एकूण ५६ लाख ९६ हजार आयुष्मान लाभार्थी आहेत; परंतु त्यापैकी केवळ १६ लाख ३७ हजार लाभार्थ्यांचीच कार्डे प्रत्यक्षात तयार झाली आहेत. याचा अर्थ ठाणे जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के नागरिकांकडे अद्याप आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाची प्रतीक्षा न करता स्वतःहून पुढाकार घेऊन आपले कार्ड लवकरात लवकर तयार करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg