loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर एसटी प्रशासनाचा किती हा भोंगळ कारभार?, डिजिटल सुविधेच्या नावाखाली बसच्या वेळापत्रकाचा पत्ताच नाही; दोन स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या वेळा!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्षात त्याच सुविधेचा प्रवाशांना काहीच उपयोग होऊ द्यायचा नाही, असा प्रकार संगमेश्वर एसटी बस स्थानकातील डिजिटल माहिती फलकांच्या बाबतीत सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. बसचे वेळापत्रक, गाडीचा मार्ग, आगमन आणि प्रस्थानाची माहिती देण्यासाठी बसवण्यात आलेले दोन्ही डिजिटल फलक सध्या प्रवाशांसाठी निरुपयोगी ठरत आहेत. दुसरीकडे मोठ्या आवाजात व्यावसायिक जाहिराती मात्र अखंड सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेपेक्षा जाहिरातींच्या प्रसारणालाच अधिक महत्त्व दिले जात आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानकात लावलेल्या दोन्ही डिजिटल स्क्रीनवर जाहिरातींचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. जाहिराती संपल्यानंतर बसच्या वेळापत्रकाचा तक्ता झळकतो; मात्र त्यातील बस क्रमांक, मार्ग, सेवा प्रकार, अंदाजित वेळ, निश्चित वेळ आणि गाडीची सद्यस्थिती हे सर्व रकाने रिकामेच असतात. म्हणजे स्क्रीनवर वेळापत्रकाचा देखावा उभा करायचा, पण प्रत्यक्षात प्रवाशांना एकाही बसची माहिती द्यायची नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रवाशांना बसची माहिती मिळवण्यासाठी पुन्हा चौकशी खिडकीवर जावे लागते. मग हे डिजिटल फलक नेमके कशासाठी बसवले आहेत, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

टाईम्स स्पेशल

या भोंगळ व्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना ५ नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आला. टाइमस्टॅम्प कॅमेर्‍याच्या नोंदीनुसार रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी टिपलेल्या छायाचित्रांमध्ये दोन्ही डिजिटल फलकांवरील तारीख आणि वेळेचा गोंधळ स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रत्यक्षात ५ नोव्हेंबरची रात्र असताना दोन्ही स्क्रीनवर मात्र ०२ नोव्हेंबर २०२६ ही तीन दिवसांपूर्वीची तारीख दाखवली जात होती. एवढ्यावरच हा प्रकार थांबलेला नाही. इंग्रजी भाषेतील स्क्रीनवर ०९:१२ अशी वेळ झळकत होती, तर शेजारील मराठी स्क्रीनवर ०३:३९ अशी वेळ दाखवली जात होती. प्रत्यक्ष वेळ रात्री ८:०३ असताना एकाच स्थानकातील दोन स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या वेळा दाखवण्याचा हा प्रकार म्हणजे तांत्रिक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा असल्याचे चित्र आहे. एकाच ठिकाणी, एकाच स्थानकात आणि प्रवाशांच्या माहितीकरिता बसवलेल्या दोन स्क्रीनची वेळही एकसारखी ठेवता येत नसेल, तर या यंत्रणेच्या देखभालीची जबाबदारी कोण पार पाडत आहे? तीन दिवसांपूर्वीची तारीख स्क्रीनवर झळकत असताना संबंधित यंत्रणेतील जबाबदार अधिकार्‍यांचे याकडे लक्ष गेले नाही का? की प्रवाशांच्या सुविधांबाबत प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे? हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg