loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणाची तहान भागविल्याशिवाय कोयनेचे पाणी अन्यत्र जाणार नाही : आमदार शेखर निकम

चिपळूण (संतोष पिलके) : कोयना धरणातील पाण्यावर पहिला हक्क कोकणातील जनतेचा आहे. कोकणाची तहान भागविल्याशिवाय कोयनेचे पाणी अन्यत्र जाणार नाही , अशी ठाम भूमिका चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी मांडली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि कोकणच्या आंब्याचे भौगोलिक मानांकन अबाधित राहावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कायदेशीर लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी आपली रोखठोक भूमिका पत्रकारांसमोर मांडली. कोकणातील जनतेच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, कोयनेचे पाणी कोकणातील पाणीटंचाई असलेल्या भागांना प्रथम उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी उचलून (लिफ्टिंग) कोकणात आणण्यापेक्षा वीज न वापरता नैसर्गिक पद्धतीने पाणी आणण्याचा पर्याय तपासला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आयआयटीकडे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सोपविले आहे. धामणवणे आणि टेरव यांसारख्या ठिकाणी पाणी आणून तेथून खालच्या गावांमधील नळयोजनांना पाणी वितरित करण्याची संकल्पना असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. कोकणाची तहान भागविल्याशिवाय कोयनेचे पाणी अन्यत्र जाणार नाही, ही आपली ठाम मागणी आहे. कोकणाची गरज पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या अतिरिक्त पाण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा. या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर अधिवेशनातही आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, रत्नागिरी आणि कोकणच्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनाचा (जीआय टॅग) मुद्दाही आमदार निकम यांनी उपस्थित केला. रत्नागिरीच्या आंब्याला मिळालेले मानांकन कायम राहिले पाहिजे. वलसाड आणि जुन्नर येथेही आंब्याला मानांकन देण्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ही केवळ भावनिक नव्हे, तर कायदेशीर लढाई आहे. त्यामुळे कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी, आंबा उत्पादक आणि संबंधित घटकांनी एकत्र येऊन रत्नागिरीच्या आंब्याचे वेगळेपण आणि त्याचे मानांकन टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले. कोकणातील पाणीप्रश्न आणि हापूस आंब्याचे मानांकन हे दोन महत्त्वाचे विषय असून, या दोन्ही प्रश्नांवर कोकणच्या हिताला प्राधान्य देऊन शासनदरबारी ठाम भूमिका मांडणार असल्याचे निकम यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg