loader
Breaking News
Breaking News
Foto

कृष्णा वर्मा मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; लोटे एमआयडीसीच्या कामगार सुरक्षेचे ऑडिट करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना निवेदन

चिपळूण (ओंकार रेळेकर) : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगार कृष्णा वर्मा यांचा १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संपूर्ण लोटे एमआयडीसीमधील कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी, खेड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनाही खेड पोलीस ठाण्यामार्फत स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर कामगाराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण, मृत्यूच्या वेळी कंपनीतील उत्पादन प्रक्रिया, कामगाराचे कामाचे स्वरूप आणि त्याच्या आरोग्याची स्थिती यांची अधिकृत वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोटे-परशुराम एमआयडीसीमधील सर्व औद्योगिक व रासायनिक कारखान्यांचे विशेष सुरक्षा ऑडिट करावे, कंत्राटी कामगारांच्या वेतन, विमा, वैद्यकीय सुविधा, कामाचे तास आणि सुरक्षा साधनांची तपासणी करावी, कामगारांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी आणि कामगार प्रतिनिधी, कंपनी व्यवस्थापन व शासकीय अधिकार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे प्रांताधिकारी खेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयासह कामगार मंत्री, उद्योग मंत्री, गृह विभाग, मुख्य सचिव, कामगार व उद्योग विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे अधिकृतरीत्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच कोणत्या कार्यालयाला निवेदन पाठविण्यात आले, त्याचा जावक क्रमांक, तारीख आणि पुढील कार्यवाही याची लेखी माहिती संघटनेला देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात लोटे-परशुराम एमआयडीसीचे मोठे योगदान आहे. उद्योग वाढले पाहिजेत, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत; मात्र या विकासाच्या प्रक्रियेत कामगारांच्या जीविताशी आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये. कामगार हा केवळ कंपनीचा कर्मचारी नसून एका कुटुंबाचा आधार असतो. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका बाळा खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीविरोधात पूर्वग्रह नसून कामगारांना न्याय मिळावा, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षितता वाढावी आणि प्रशासनाने पारदर्शकपणे कार्यवाही करावी, हाच संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg