loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळ उर्दू हायस्कूलमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत पोलिसांचे विद्यार्थ्यांना सुरक्षितता,जबाबदारी,शिस्त व शिक्षणाचे मार्गदर्शन

दाभोळ ( वार्ताहर):-दाभोळ येथील ए.के.आय. सेमी इंग्लिश हायस्कूल येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत मार्गदर्शन व समुपदेशन सत्र कार्यक्रम उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, सामाजिक जबाबदारी, शिस्त, सायबर जागरूकता तसेच शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास सागरी पोलीस ठाणे, दाभोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल श्री. निकेतन शिंदे, तीन होमगार्ड, केंद्रप्रमुख श्री. राजेंद्र हारळ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री. खान इम्रान दाऊद उपस्थित होते. शिक्षक, पालक, पालक शिक्षक संघ आणि विद्यार्थी व भौतिक सुविधा विकसन समिती सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल गोरे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सोशल मीडिया वापराबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डिजिटल युगात सोशल मीडिया हे ज्ञान आणि संवादाचे प्रभावी माध्यम असले, तरी त्याचा वापर जबाबदारीने आणि सावधगिरीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन फसवणूक, अनोळखी व्यक्तींशी संपर्क, वैयक्तिक माहितीचा गैरवापर आणि सोशल मीडियावरील विविध धोक्यांपासून विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कोणतीही सायबर फसवणूक किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता तातडीने मदत घ्यावी, असे सांगताना त्यांनी आपत्कालीन मदतीसाठी 112 आणि सायबर फसवणुकीसाठी 1930 या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती दिली.

टाइम्स स्पेशल

यानंतर पोलीस कॉन्स्टेबल श्री. निकेतन शिंदे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही वाहतूक व रस्ते सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रस्त्यावरची सुरक्षितता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून वाहतुकीचे नियम पाळणे ही केवळ कायदेशीर बाब नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाचे रक्षण करण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मोटार वाहन चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि रस्त्यावर नेहमी सावधगिरी बाळगावी, असे त्यांनी सांगितले.यासोबतच शाळा आणि समाजात असभ्य, अपमानास्पद किंवा अयोग्य भाषा वापरू नये, शिक्षक, पालक, सहकारी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करावा, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात कोणतीही टोकदार किंवा धारदार वस्तू आणू नये आणि शाळेतील सर्व सुरक्षा व शिस्तीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात इयत्ता नववी आणि विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत विशेष मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, वेळेचे योग्य नियोजन करावे आणि शाळेत नियमित उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.“शिक्षण हीच उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आहे,” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर अनावश्यक गोष्टींपेक्षा शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले. नियमित शाळेत उपस्थिती, शिस्तबद्ध वर्तन, शिक्षकांचा आदर आणि सातत्यपूर्ण अभ्यास या चार गोष्टी विद्यार्थ्यांच्या यशाचा मजबूत पाया ठरतात, यावर विशेष भर देण्यात आला. नवसे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हराळ यांनी मुलांचे मार्गदर्शन करत सागरी पोलीस ठाणे दाभोळ यांचे मनःपूर्वक आभार मानले व पुढेही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा दर्शवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg