loader
Breaking News
Breaking News
Foto

कोणतेही डायलिसिस सेंटर बंद पडू देणार नाही, रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही :आमदार किरण सामंत यांचा आक्रमक पवित्रा आणि राज्यात पहिला आवाज!

रत्नागिरी (किशोर मोरे) : लांजा-राजापूर तसेच रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील डायलिसिस रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी दिला आहे. मतदारसंघातील डायलिसिस सेंटर बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्यास ते तातडीने थांबवावेत, अन्यथा उद्या डायलिसिस सेंटर स्वतः उघडून रुग्णसेवा सुरू करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. डायलिसिस हा किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार आहे. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते. अशा परिस्थितीत सेंटर बंद झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना उपचारांसाठी दूरवर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मतदारसंघातील डायलिसिस सेंटर सुरू राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डायलिसिस सेंटर बंद करण्यासाठी संबंधित एजन्सी बंद यांनी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नयेत. रुग्णांचे उपचार बंद पडल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील. रुग्णसेवा जाणीवपूर्वक बंद करून त्यांच्या जीविताशी खेळ केला गेल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात मनुष्यवधासह लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचा इशाराही आमदार सामंत यांनी दिला.डायलिसिस सेंटर बंद करण्यामागे टेक्निशियन किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न असेल, तर त्यावरही मार्ग काढण्याची तयारी आमदार सामंत यांनी दर्शवली आहे. कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेवा बंद पडू देणार नाही. प्रशासनाने किंवा संबंधित यंत्रणेने जबरदस्तीने सेंटर बंद करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच डायलिसिस टेक्निशियनना सोबत घेऊन त्यांच्या पगाराची जबाबदारी स्वतःच्या खर्चातून उचलण्यासही आपण तयार आहोत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर परिसरातील डायलिसिस रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारांसाठी आर्थिक तसेच प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत उपलब्ध असलेली डायलिसिस सेंटर बंद करून रुग्णांना अधिक संकटात ढकलणे योग्य नाही. प्रशासकीय निर्णय, आर्थिक प्रश्न किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे सामान्य रुग्णांना वेठीस धरले जाऊ नये. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रुग्णांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.मतदारसंघातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. डायलिसिससारखी जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. सेंटर बंद करण्याऐवजी कर्मचाऱ्यांचे वेतन, आवश्यक मनुष्यबळ आणि इतर प्रशासकीय अडचणी सोडविण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा आमदार सामंत यांनी व्यक्त केली.लांजा-राजापूर आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील एकाही डायलिसिस रुग्णावर उपचाराअभावी संकट ओढवू देणार नाही. रुग्णसेवा सुरूच राहिली पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत डायलिसिस सेंटर बंद होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

गरज पडल्यास मी स्वतः खर्च करेन....

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg