loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा एल्गार; आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू

संगलट (प्रतिनिधी) - विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (रजि. क्र. १०२९) च्या वतीने तांत्रिक कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ‘चलो मुंबई’च्या घोषणेसह राज्याच्या विविध भागांतून हजारो तांत्रिक कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण विभागातूनही मोठ्या संख्येने कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. युनियनची स्थापना ४ सप्टेंबर १९७७ रोजी झाली असून, ‘एकता हीच शक्ती’ हे ब्रीदवाक्य घेऊन संघटना गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहे. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये कामाच्या ठिकाणी उद्भवणार्‍या तांत्रिक अडचणी आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न, कंपनीच्या हितासाठी सादर केलेल्या प्रस्तावांवर कार्यवाही न होणे, अनेक कर्मचार्‍यांना दोन वेतनवाढींचा लाभ न मिळणे, तसेच उच्च पदाच्या लाभांबाबत गेल्या १६ वर्षांपासून असलेली विसंगती दूर करणे, या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय कामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, पूल सिस्टीमच्या नावाखाली होणारी कामगारांची पिळवणूक थांबवणे, यंत्रचालक पदाची अंतर्गत भरती तातडीने करणे, एसईबीसी-ईएसबीसी प्रवर्गातील कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे, विद्युत सहाय्यक यांना इंधन भत्ता व घरभाडे भत्ता लागू करणे, महिला सहाय्यक यांना संगोपन रजा मिळावी यांसारख्या महिला कर्मचार्‍यांच्या अत्यंत महत्त्वाच्या समस्या मार्गी लावणे आणि रिस्ट्रक्चरिंगची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे, अशा मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. गुरुवारी सकाळपासून आझाद मैदानावर महिला व पुरुष तांत्रिक कामगारांची मोठी उपस्थिती दिसून आली. आंदोलनस्थळी व्यासपीठावरून युनियनच्या नेत्यांनी शासन व प्रशासनाला कामगारांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘जय तांत्रिक’च्या घोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून गेला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक कामगार अनेकदा जीव धोक्यात घालून काम करतात. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेसह वेतन, पदोन्नती, आवश्यक साहित्य आणि इतर मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. या प्रश्नांकडे शासन व संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

दुर्लक्षित झालेल्या आपल्या तांत्रिक कामगारांना न्याय मिळावा याच एका उद्देशाने आपली संघटना जन्माला आली. आणि तिचे नेतृत्व हे खाकी वर्दीतील कामगारानेच केले आजपर्यंत संघटनेने कामगारांचे असंख्य प्रश्न सोडवले आहेत आणि हे काम पुढेही असेच सुरू राहील. आपल्या तांत्रिक कामगारांचे हित जपणारी ही एकमेव संघटना आहे. ही संघटना आपल्या कामगारांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करेल. हा लढा आपल्या संपूर्ण तांत्रिक कामगारांचा आहे, आपल्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा आहे. त्यांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित सर्व आंदोलकांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. रत्नागिरी विभागातून धरणे आंदोलन आझाद मैदान येथे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे प्रादेशिक सहसचिव संजय भोसले, झोन अध्यक्ष किशोर साळुंखे, झोन उपाध्यक्ष महेंद्र पारकर, झोन सचिव महेंद्र शिवलकर व पतसंस्था सचिव राजेश शिंदे या पदाधिकार्‍यांसह संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेल्या या आंदोलनातून शासन व प्रशासन काय भूमिका घेते, याकडे राज्यातील विद्युत क्षेत्रातील तांत्रिक कामगारांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg