loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली-डोबाशेळ येथील प्रकार; तिलारी कालव्यात गोधडीत गुंडाळलेल्या वृद्धाचा मृतदेह, ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

बांदा : इन्सुली-डोबाशेळ येथील तिलारी कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त केला जात असला तरी मृत्यूचे नेमके कारण आणि या घटनेमागील सत्य पोलीस तपास व शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मंगळवारी सकाळी कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. मृतदेहाजवळच गोधडी आढळून आल्याने या घटनेबाबतचे गूढ वाढले आहे. नागरिकांनी तातडीने बांदा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोधडीसह मृतदेह कालव्यात आढळल्याने संबंधित वृद्धाचा मृतदेह रात्रीच्या वेळी येथे आणून टाकण्यात आला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, हा घातपात आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज शिंदे हे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. कालवा खोल असल्याने पंकज शिंदे यांनी स्वतः कालव्यात उतरून मृतदेहाची पाहणी केली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

टाईम्स स्पेशल

मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, मृतदेह कालव्यात कसा आला आणि तो येथे कोणी आणून टाकला, याचा तपास बांदा पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल तसेच सखोल पोलीस तपासानंतर या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी बांदा पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यासह गोवा व इतर भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास बांदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg