loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थी आत्महत्येचा धक्कादायक आकडा; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे, 10 वर्षांत 80 टक्क्यांनी वाढ

मुंबई. देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (NCRB) Accidental Deaths & Suicides in India 2024 अहवालानुसार, 2024 मध्ये देशभरात 14 हजार 488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. 2014 मध्ये ही संख्या 8 हजार 68 होती. म्हणजेच दहा वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये 79.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2024 मधील आकडा हा या दशकातील सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

2014 ते 2024 या 11 वर्षांच्या कालावधीत देशभरात एकूण 1 लाख 23 हजार 918 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच या कालावधीत दरवर्षी सरासरी 11 हजारांहून अधिक विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडले. 2024 मध्ये एकट्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या 14 हजार 488 इतकी होती. 2023 मध्ये देशात 13 हजार 892 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. त्याच्या तुलनेत 2024 मध्ये या संख्येत 4.3 टक्क्यांची वाढ झाली. विशेष म्हणजे, 2022 हे एकमेव वर्ष होते ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत किंचित घट नोंदवण्यात आली,त्यानंतर पुन्हा वाढीचा कल दिसून आला. राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. 2024 मध्ये देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी महाराष्ट्राचा वाटा 13.2 टक्के होता. म्हणजेच 14 हजार 488 पैकी 1 हजार 909 विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 585, मध्य प्रदेशमध्ये 1 हजार 447 आणि तामिळनाडूमध्ये 1 हजार 287 विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडले. 2024 मध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या चार राज्यांमध्ये देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या मोठ्या प्रमाणातील घटना नोंदल्या गेल्या आहे.2024 मधील 14 हजार 488 विद्यार्थी आत्महत्यांमध्ये 7 हजार 669 पुरुष विद्यार्थी आणि 6 हजार 819 महिला विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न केवळ एका लिंगापुरता मर्यादित नसल्याचे आकडेवारीतून दिसते.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या चर्चेत परीक्षा, निकाल आणि स्पर्धा परीक्षांचा ताण यांचा उल्लेख वारंवार केला जातो. मात्र, NCRBच्या व्यापक आत्महत्या आकडेवारीकडे पाहिल्यास एकाच कारणावर या घटनांचे स्पष्टीकरण देता येत नाही. कौटुंबिक समस्या, आजारपण, व्यसनाधीनता, आर्थिक-सामाजिक अडचणी आणि इतर विविध कारणांची नोंद आत्महत्यांच्या कारणांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून न पाहता कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक वातावरण या सर्व पातळ्यांवर विचार करण्याची गरज आहे. 14 हजार 488 ही संख्या 2024 च्या 366 दिवसांमध्ये विभागल्यास दररोज सरासरी सुमारे 40 विद्यार्थी आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडल्याचे चित्र दिसते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत गेल्या दशकात झालेली जवळपास 80 टक्क्यांची वाढ त्यामुळे अधिक चिंताजनक ठरते. महाराष्ट्रात शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी ग्रामीण आणि निमशहरी भागातून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये येतात. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअरची अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा यांसारख्या विविध परिस्थितींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. मात्र, NCRBची आकडेवारी एखाद्या विशिष्ट कारणाला महाराष्ट्रातील या घटनांसाठी जबाबदार ठरवत नाही.त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशन व्यवस्था मजबूत करणे, विद्यार्थ्यांना मानसिक ताणाबाबत मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण उपलब्ध करून देणे आणि संकटाच्या काळात तातडीची मदत मिळण्याची व्यवस्था करणे, हा या आकडेवारीतून पुढे येणारा महत्त्वाचा मुद्दा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg