loader
Breaking News
Breaking News
Foto

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या मूळगावी स्मारकाचे भूमिपूजन; सिंधुदुर्गात दोन कोटींच्या प्रकल्पाचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) - पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून वैभववाडी तालुक्यातील हेत या त्यांच्या मूळगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम पुढील १२ महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्मारक उभारणे एवढेच महत्त्वाचे नसून ते दर्जेदार असावे, त्यातून नारायण सुर्वे यांचे विचार आणि साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच त्याची नियमित देखभाल व्हावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. नारायण सुर्वे हे कोकणातील एक अनमोल रत्न असून, त्यांच्या मूळगावी भव्य स्मारक उभारण्यामागे त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण कायम जिवंत ठेवण्याचा उद्देश असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. सुर्वे कुटुंबीयांसह त्यांना मानणाऱ्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरणार आहे. वैभववाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण सुर्वे यांच्यासारखे महान साहित्यिक होऊन गेले, याची जाणीव भावी पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्मारक परिसरात वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह, कार्यालय, बाहेरील बाजूस बहुउद्देशीय व्यासपीठ तसेच स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. मात्र, केवळ इमारत उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश नसून नारायण सुर्वे यांनी कोणत्या परिस्थितीत जीवनप्रवास केला, त्यांच्या कविता कोणत्या सामाजिक वास्तवातून निर्माण झाल्या आणि त्यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा व परिवर्तनाचे विचार कशा प्रकारे मांडले, याची माहिती या वास्तूतून मिळाली पाहिजे, असे राणे यांनी स्पष्ट केले. नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा, जीवनप्रवासाचा आणि सामाजिक योगदानाचा अभ्यास करून त्यांचे विचार पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवणारे स्मारक उभारण्यात येईल, असा विश्वास त्यांनी सुर्वे कुटुंबीयांना दिला. स्मारकाच्या भूमिपूजनानंतर त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे जितके आवश्यक आहे, तितकीच त्याची देखभाल करणेही महत्त्वाचे आहे, असे नितेश राणे यांनी ठामपणे सांगितले. अनेक ठिकाणी स्मारकांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उत्साहात होते; मात्र त्यानंतर स्वच्छता, देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते, असा अनुभव त्यांनी मांडला.

टाईम्स स्पेशल

हेत येथे स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या सुर्वे कुटुंबीयांचे, लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच वैभववाडी मतदारसंघातील विकासकामांबाबत नागरिकांनी चिंता करू नये, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता दिनेश बागुल, वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, सुभाष रावराणे, उपसभापती साची कोलते, श्रावणी रावराणे, भाजप मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिर काझी, भालचंद्र साठे, वैभववाडी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील महिला तालुका अध्यक्षा प्राची तावडे, माजी महिला व बालकल्याण सभापती शारदा कांबळे, दीपक फोंडके, किशोर कांबळे, रिद्धी सुतार, देवानंद पालांडे, राजेंद्र राणे, मधुकर सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, बाळकृष्ण सुर्वे, रमाकांत सुर्वे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सुर्वे कुटुंबीय आणि हेत ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg