loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये ‘स्वर-दीपज्योती’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुरेल गीतांनी सांस्कृतिक केंद्र झाले मंत्रमुग्ध!

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरात संगीत, कला आणि सांस्कृतिक परंपरेचा सुरेल आविष्कार अनुभवायला मिळाला. खेड नगरपरिषदेच्या वतीने तसेच क्रीडा, सांस्कृतिक व शिक्षण समितीच्या आयोजनातून ‘एक संगीतमय स्वरसंजन’ या विशेष उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर-दीपज्योती’ या संगीत कार्यक्रमाला संगीतप्रेमी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना सुरेल संगीताची अनोखी मेजवानी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच संगीताचा रंग चांगलाच खुलला. ताल, सूर आणि लय यांचा सुरेख संगम असलेल्या या संगीत मैफलीत भावगीते, भक्तिगीते, लोकगीते तसेच सदाबहार हिंदी-मराठी चित्रपट गीतांची बहारदार मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. एकापेक्षा एक लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणामुळे सांस्कृतिक केंद्रात टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘भारत का अद्भुत कलश’ आणि ‘आता होऊ दे धिंगाणा’ यांसारख्या कार्यक्रमांमधून प्रसिद्धी मिळवलेले गायक सिद्धेश जाधव यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. ‘आता होऊन जाऊ दे’ (स्टार प्रवाह) फेम गायिका पमजा पाटील, ‘सारेगमप’ फेम गायक प्रतीम बांदेकर तसेच राज्य पुरस्कार प्राप्त शास्त्रीय गायिका अमिता घुगरी यांनी आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. प्रत्येक कलाकाराने आपल्या वेगळ्या गायनशैलीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायनातील वैविध्य, सुरांची अचूकता आणि सादरीकरणातील उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. गुजरातसह दिल्ली येथील संगीताच्या विविध शैलींचा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक केंद्रात सुरेल आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले. संगीताच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक परंपरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून खेड नगरपरिषदेचे सभापती भूषण चिखले तसेच समिती सदस्य स्वप्नील सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, रहीम सहीबोले आणि रेश्मा खतिब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाला समाजसेविका श्रेया कदम, तहसीलदार सुधीर सोनवणे, नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश गणपत चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, उत्तमकुमार जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रेया कदम यांनी खेड नगरपरिषदेच्या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशाच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील नागरिकांना मनोरंजनासोबतच संगीत आणि कलेचा आनंद घेण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नागरिकांमध्ये सांस्कृतिक जाणीव निर्माण करणे आणि संगीताची आवड जोपासणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर-दीपज्योती’ कार्यक्रमाने खेडकरांच्या मनावर सुरेल ठसा उमटवला. कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी दिलेली दाद आणि संपूर्ण कार्यक्रमात अनुभवायला मिळालेला उत्साह यामुळे हा संगीत सोहळा संस्मरणीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg