loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवून द्या, नगरसेवक रविकिरण तोरसकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

मालवण (प्रतिनिधी) - देशातील पहिला ’पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या समुद्रकिनार्‍यांचा समावेश आंतरराष्ट्रीय ’ब्लू फ्लॅग’ मानांकन योजनेत करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक तथा नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या २०२६- २७ च्या आंतरराष्ट्रीय ’ब्लू फ्लॅग’ मानांकन यादीत महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लाडघर, गुहागर व श्रीवर्धन या समुद्रकिनार्‍यांनी पहिल्यांदाच स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. मात्र, अथांग निसर्गसौंदर्य, स्वच्छ रुपेरी वाळू आणि समृद्ध सागरी जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही समुद्रकिनार्‍याचा यात अद्याप समावेश झालेला नाही, याकडे रविकिरण तोरसकर यांनी लक्ष वेधले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील तारकर्ली, देवबाग, चिवला, वायरी, दांडी यांसह तळाशील ते आचरा, निवती, भोगवे, सागरेश्वर, आरवली, केळुस आणि विजयदुर्ग या किनार्‍यांमध्ये ’ब्लू फ्लॅग’ मानांकनाचे सर्व ३३ आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या ’बीईएएमएस’ प्रकल्पांतर्गत तसेच राज्य शासनाच्या पर्यटन आणि बंदर विकास विभागाच्या निधीतून या किनार्‍यांचा विकास झाल्यास सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील प्रमुख समुद्रकिनार्‍यांचा विशेषतः मालवण येथील तारकर्ली, देवबाग व चिवला ब्लू फ्लॅग मानांकन प्रक्रियेत समावेश करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि पर्यटन विभागाला तात्काळ प्राथमिक सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश द्यावेत.

टाईम्स स्पेशल

सीआरझेड नियमांतील विशेष सवलतींनुसार किनार्‍यांवर बांबू व लाकडापासून बनवलेली पर्यावरणपूरक स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम्स, सौरऊर्जा दिवे, घनकचरा व्यवस्थापन, जीवरक्षक टॉवर आणि दिव्यांगांसाठी रॅम्प उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा. हा प्रकल्प राबवताना स्थानिक मच्छीमार बांधवांच्या पारंपरिक मासेमारी आणि बोटी लावण्याच्या हक्कांचे पूर्णपणे संरक्षण करण्यात यावे. पालकमंत्र्यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सिंधुदुर्गच्या किनारी पर्यटनाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती तोरसकर यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमटीडीसीचे प्रादेशिक अधिकारी आणि मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg