loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री क्षेत्र टेरव येथे ११ ऑक्टोबरपासून भव्य नवरात्रोत्सव

चिपळूण : दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथील भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही आदिशक्ती जगद्जननी श्री भवानी वाघजाई मातेचा भव्य नवरात्रोत्सव धार्मिक विधी, पूजन व पारंपरिक रूढी-परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सवाचे विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट तसेच पालखीची विशेष सजावट करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई व कुलस्वामिनी देवींच्या मूर्तींना वारानुसार नवरंगांच्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात मंदिरातील देवींचे मनोहारी रूप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री क्षेत्र टेरव येथील मंदिरात ७.५ फूट उंचीची अत्यंत सुंदर व अप्रतिम कृष्णशिळेतील श्री भवानी मातेची मूर्ती असून, त्यासोबत गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे श्री भवानी मातेबरोबरच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित करण्यात आल्या आहेत. भैरी-भवानी आणि नवदुर्गा यांचे एकत्रित दर्शन घडणारे हे देवस्थान महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण देवस्थानांपैकी एक असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण दाक्षिणात्य वास्तुशैलीत उभारलेले हे मंदिर सध्या भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. नागमोडी वळणाचा रस्ता, वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठार, भव्य गोपुरे, आकर्षक देवतामूर्ती, मनमोहक उद्यान तसेच देवराईतील हिरवीगार वनराई आणि आल्हाददायक गारवा यामुळे श्री क्षेत्र टेरवला भेट देणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या वाढत आहे.

टाईम्स स्पेशल

निसर्गसौंदर्याने नटलेले हे देवस्थान धार्मिक व आध्यात्मिक केंद्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होत आहे. जागृत देवस्थान, नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, संकटविमोचक देवी म्हणून श्री भवानी वाघजाई मातेची ख्याती आहे. महाराष्ट्र शासनाने या स्थळाला यात्रास्थळाचा व पर्यटनाचा ‘क’ दर्जा तसेच तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्रदान केला आहे. श्री क्षेत्र टेरव येथील श्री भवानी-वाघजाई मातेच्या दर्शनासोबतच भाविक व पर्यटकांना चिपळूण येथील विंध्यवासिनी मंदिर, परशुराम मंदिर, दसपटीची रामवरदायिनी, तुरंबव येथील शारदादेवी मंदिर तसेच मार्लेश्वर मंदिर आदी धार्मिक स्थळांनाही भेट देता येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार असून ओटीचे साहित्य मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह विविध भागांतून येणाऱ्या भाविकांनी श्री भवानी वाघजाई मातेच्या दर्शनाचा आणि नवरात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, श्री क्षेत्र टेरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg