loader
Breaking News
Breaking News
Foto

तांबेडी ग्रामपंचायत अल्पमतात, तडकाफडकी ४ सदस्यांचे राजीनामे

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांपैकी चार सदस्यांनी नुकतेच तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एका सदस्याने वर्षभरापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यामुळे आतापर्यंत एकूण पाच सदस्यांनी राजीनामे दिल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देताना विकासकामांबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप केल्याचे समजते. ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित विकासकामांची माहिती सदस्यांना मिळत नसेल, तर लोकप्रतिनिधींनी गावाचा कारभार नेमका कसा करायचा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदस्यांच्या नाराजीमागे विकासकामांच्या माहितीचा मुद्दा असल्याने ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यासंदर्भात ग्रामसचिव सचिन करंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदस्यांचे राजीनामे प्राप्त झाल्याचे मान्य केले. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीची मासिक बैठक होणार आहे. या बैठकीत राजीनामे संबंधित सदस्यांनीच दिले आहेत का, याची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती करंडे यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

चार सदस्यांच्या ताज्या राजीनाम्यांमुळे आणि यापूर्वीच्या एका राजीनाम्यामुळे ग्रामपंचायतीच्या संख्याबळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे राजीनामे मंजूर झाल्यास ग्रामपंचायतीच्या कामकाजावर त्याचा काय परिणाम होणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, सरपंच आणि उपसरपंच नाराज सदस्यांची समजूत काढून त्यांचे राजीनामे मागे घेण्यात यशस्वी होतात का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. गुरुवारच्या मासिक बैठकीत राजीनाम्यांबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि ग्रामपंचायतीतील हा वाद कशा प्रकारे मिटतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg