loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा बीटस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ११० विद्यार्थ्यांचा सहभाग

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - विद्यार्थ्यांची गणितीय क्षमता, स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढविण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने साखरपा बीटाचे विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली बीटस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत पाच केंद्रांतील तब्बल ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या बुद्धिमत्तेची आणि स्मरणशक्तीची चुणूक दाखविली. 'शाळा ही उपक्रमांची मोहोळ झाली पाहिजे' या महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रत्यय या स्पर्धेच्या माध्यमातून आला. रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीतील ठरावानुसार विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आणि आकलनशक्ती विकसित करण्यासाठी शाळांमध्ये पाढे पाठांतराचे उपक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने साखरपा नं. १ या बीट शाळेत या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साखरपा १ व २, किरबेट, वांझोळे आणि मारळ या पाच केंद्रांतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना तब्बल ४० पर्यंतचे पाढे तोंडपाठ असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या या असामान्य स्मरणशक्तीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १४ महिला शिक्षिकांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली. प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी शिक्षणप्रेमी मंगेश दळवी, लक्ष्मण कदम आणि अमोल लाड यांनी शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मोलाचे सहकार्य केले. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : इयत्ता पहिली : सौजन्य नाईक (कुड्याचा माच), माही घडशी (कनकाड गोताडवाडी), अद्वैत कात्रे (पुर्ये). इयत्ता दुसरी : युग आणेराव (आंगवली), ओवी सावंत (कोंडगाव), सार्थक करंबेळे (कासार कोळवण). इयत्ता तिसरी : प्रज्ञेश पाटील (ढवळवाडी), कार्तिक राबांडे (ढवळवाडी), आर्या पवार (किरबेट). इयत्ता चौथी : विहान कानडे (मोर्डे), स्वराज पांगळे (पुर्ये), आरूष भोवड (पुर्ये). इयत्ता पाचवी : पार्थ तांदळे (गोताडवाडी), चैतन्य शिंदे (साखरपा नं. १), स्वरा सावंत (कोंडगाव). इयत्ता सहावी : गौरवी कानडे (मोर्डे), श्रुती अडबल (बोंड्ये), विरेन कबाडे (साखरपा नं. १). इयत्ता सातवी : पार्थ सावंत (साखरपा नं. १), स्वरा धावडे (करंबेळे), जीत जोशी (कनकाडी), मनस्वी कोलापटे (पुर्ये).

टाईम्स स्पेशल

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र समन्वयक दिव्या भाटकर, बाबासो यादव, तुकाराम शिंदे आणि संजय घुटे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी रूपेश जाधव, नथू सोनवणे, शशिकांत कांबळे, रोहिदास मांडवकर, धनाजी मोठे, मच्छींद्र लाड, मंगेश सागवेकर, विद्या माने यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन केंद्र समन्वयक बाबासाहेब लाड यांनी केले, तर विलास कानर यांनी आभार मानले. पाढे पाठांतरासारखा साधा वाटणारा उपक्रम विद्यार्थ्यांच्या गणिती पायाभरणीसाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण साखरपा बीटस्तरीय स्पर्धेने घालून दिले आहे. केवळ गुण मिळविण्यापेक्षा ज्ञान, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास वाढविणाऱ्या अशा उपक्रमांची शाळाशाळांमध्ये चळवळ उभी राहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभिनव संकल्पनेबद्दल विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg