loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली-बिलेवाडीत पहाटे ४ वाजता हत्ती थेट नागरिकांच्या घराच्या दारात; वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

इन्सुली (बिलेवाडी) : गावातील नागरिकांची पहाट नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. कुणी भातमळणीच्या कामासाठी उठले होते, तर कुणी रोजच्या कामाची तयारी करत होते. मात्र, आज पहाटेचा अनुभव नागरिकांसाठी थरकाप उडवणारा ठरला. कारण चक्क पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हत्ती थेट नागरिकांच्या घराच्या दरवाजात उभा असल्याचे पाहायला मिळाले! इन्सुली-बिलेवाडी येथे श्री. गजेंद्र कोठावळे आणि श्री. सीताराम कोठावळे यांच्या घराच्या दरवाजात हत्ती दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक समोर आलेला भला मोठा हत्ती पाहून नागरिक थक्क झाले. काही क्षणांसाठी नेमके काय करावे, हेही कुणाला सुचेना. हत्ती शांत अवस्थेत दिसत असला, तरी तो अखेर जंगली प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या वर्तनाचा भरवसा नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पहाटे चार वाजेपर्यंत हत्ती थेट लोकवस्तीतील घरांच्या दारात पोहोचतो, मात्र संबंधित वनकर्मचारी आणि वनविभागाला याची पूर्वकल्पना किंवा माहिती होती का? जर माहिती नव्हती, तर वनविभागाची गस्त नेमकी कुठे होती? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने अशा घटनांकडे इतके दुर्लक्ष का करावे?हत्ती नागरिकांच्या दारात पोहोचेपर्यंत वनविभागाची यंत्रणा नेमकी काय करत होती? हा प्रश्न आता बिलेवाडीतील नागरिक विचारत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेत केवळ नागरिकांच्या जीविताचाच प्रश्न नाही, तर घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हत्तीने वाहनांचे नुकसान केले, घरांची तोडफोड केली किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?सर्वसामान्य नागरिकांनी कर्ज काढून, कष्टाने घेतलेली वाहने आणि उभी केलेली मालमत्ता अशा वन्यप्राण्यांच्या वावरामुळे धोक्यात येत असेल, तर सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांचे किंवा इतर मालमत्तेचे हत्तीमुळे नुकसान झाल्यास शासनाने नुकसानभरपाईची जबाबदारी घ्यावी आणि त्यासाठी स्पष्ट व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.सध्या भातमळणीचे दिवस सुरू आहेत. शेतकरी पहाटेपासून शेतात आणि खळ्यावर कामाला लागतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वर्षभर कष्ट करून पिकवलेले भात घरी आणण्याची ही वेळ आहे. मात्र, अशा परिस्थितीत हत्तींच्या वावरामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. हत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले, घरांचे नुकसान झाले, वाहनांचे नुकसान झाले किंवा दुर्दैवाने एखाद्या नागरिकाच्या जीविताला धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नुकसान झाल्यानंतर पंचनामे आणि भरपाईच्या प्रक्रियेपेक्षा नागरिकांचे प्राण वाचवणे अधिक महत्त्वाचे नाही का?

टाइम्स स्पेशल

या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या परिसरात ओंकार हत्तीचा वावर असल्याची चर्चा आहे. त्याच्यासोबत वनविभागाचे कर्मचारी असतात, अशी माहितीही नागरिकांमध्ये आहे. मग बिलेवाडीतील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेला हा हत्ती ओंकारच होता का? की परिसरात आणखी हत्तींचा वावर सुरू आहे?वनविभागाने याबाबत नागरिकांना अधिकृत आणि स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे. केवळ हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून चालणार नाही, तर लोकवस्तीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे.वनविभागाने तातडीने बिलेवाडी व परिसरात गस्त वाढवावी, हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, नागरिकांना वेळेवर सतर्कतेचे संदेश द्यावेत आणि आवश्यक ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात.हत्ती जंगलात असताना त्याचे संरक्षण व्हायलाच हवे; पण तो लोकवस्तीत येत असेल, तर माणसांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही सरकार आणि वनविभागाने तितक्याच गांभीर्याने पार पाडली पाहिजे.शेतकऱ्यांनी वर्षभर घाम गाळून पिकवलेले धान्य भीतीच्या सावटाखाली मळायचे का? सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या घराच्या दारात हत्ती येण्याची धास्ती घेऊन जगायचे का? घरासमोर वाहने उभी करतानाही जीव मुठीत धरायचा का?आता तरी संबंधित वनविभागाचे अधिकारी आणि प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलावीत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक गरजेचे आहे.बिलेवाडीकरांचा प्रशासनाला सवाल — हत्तींच्या वावरापासून आमच्या जीविताचे, घरांचे, वाहनांचे आणि शेतीचे संरक्षण करणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg