loader
Breaking News
Breaking News
Foto

मांडकी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत इमारतीचे स्वप्न साकार; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते लोकार्पण

चिपळूण (संतोष पिलके) - चिपळूण तालुक्यातील मांडकी ग्रामस्थांची स्वतंत्र आणि सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून शासनाकडून ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने ग्रामपंचायतीची नवी वास्तू उभी राहिली आहे. या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. ग्रामस्थांचे अनेक दिवसांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण होते. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून आमदार शेखर निकम यांनी मांडकी ग्रामस्थांच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम योजनेंतर्गत १५ लाख रुपये, तर जनसुविधा योजनेंतर्गत १५ लाख रुपये असा एकूण ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत साकारण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले की, राजकारण हे केवळ पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचे साधन नसून जनतेची कामे करण्याची जबाबदारी आहे. गावातील नागरिकांच्या गरजा आणि अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. मांडकी ग्रामस्थांची स्वतंत्र ग्रामपंचायत इमारतीची मागणी रास्त होती. गावाच्या प्रशासकीय कामकाजासाठी स्वतःची सुसज्ज वास्तू असणे आवश्यक असल्याने या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. आज ग्रामस्थांच्या सहकार्याने हे स्वप्न साकार झाले, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, केवळ निधी मंजूर करून विकासकामांची जबाबदारी संपत नाही, तर त्या निधीतून नागरिकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणारी सुविधा निर्माण होणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची पहिली पायरी आहे. या वास्तूतून सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचावा आणि गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गावाच्या गरजा आणि ग्रामस्थांची साथ असेल, तर भविष्यातही विविध विकासकामांसाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, या ग्रामपंचायत इमारतीच्या उभारणीमध्ये सामाजिक योगदानाचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. (कै.) परशुराम पाध्ये यांनी ग्रामपंचायत इमारतीसाठी स्वतःची जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली. गावाच्या सार्वजनिक हितासाठी त्यांनी दिलेले हे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. याबद्दल अमोद पाध्ये आणि पाध्ये कुटुंबीयांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शासनाचा निधी, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि ग्रामस्थांचे सहकार्य यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही वास्तू साकार झाली आहे. नवीन ग्रामपंचायत इमारतीमुळे मांडकी गावाच्या प्रशासकीय कामकाजाला स्वतंत्र आणि सुसज्ज जागा उपलब्ध झाली असून ग्रामस्थांना आपल्या विविध प्रश्नांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. गावातील विकासकामांचे नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ही वास्तू महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला बाळशेठ जाधव, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, पंचायत समिती सदस्य शरद शिगवण, विस्तार अधिकारी केळस्कर, प्रशासक चिपळूणकर, स्वप्निल कांबळे, अनंत खांबे, संदीप खांबे, अविनाश पवार, आबा खैर, उमेश राजेशिर्के, शशिकांत खांबे, अनंत पवार, डॉ. ज्ञानेश्वर खांबे, नारायण खैर, बाळराम घाणेकर, बाबाजी घाणेकर, विजय भुवड, पोलीस पाटील सचिन खैर, तेजस घाणेकर, प्रमोद खेडेकर, दत्तात्रय तेटांबे, संजय पवार, रत्नकांत खांबे, सुभाष डोंगर, अमोद पाध्ये यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg