loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी घाटात १६ चाकी ट्रकने लक्झरी बसला जोरदार दिलेली धडक आणि या अपघातात जखमी झालेले प्रवासी, एक आढावा

लांजा (संजय साळवी) - मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या सोळा चाकी ट्रकने पुढे असलेल्या एका खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांसहित २६ जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाजवळ घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश अनंत जोशी (३४ वर्षे, रा. विरार, ठाणे) हा आपल्या ताब्यातील लक्झरी बस (क्र. एमएच ४८ डीसी ९४३९) घेऊन विरार ते मालवण असा चालला होता. या लक्झरी बसमधून एकूण २७ प्रवासी प्रवास करत होते. ही लक्झरी बस आंजणारी घाटातील उतार उतरत असताना आंजणारी पुलाजवळ आली असता पाठीमागून आलेल्या एका १६ चाकी ट्रकने (क्र. आरजे १९ जीजे ४७८६) या बसला जोरदार धडक दिली. हा ट्रक चालक दिलावर सुमार खान (३५ वर्षे, रा. जैसमलेर, राजस्थान) हा चालवित होता. पहिल्या धडकेनंतर काही क्षणातच या ट्रकची बसला दुसर्‍यांदा जोरदार धडक बसली, ज्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच पलटी झाली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, पलटी झालेली बस महामार्गावर तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत गेली. पहाटेच्या सुमारास अचानकपणे घडलेल्या या अपघातानंतर प्रवाशांचा एकच आरडाओरडा सुरू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक पोलीस आणि लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातातील गंभीर जखमींना जिजाऊ संस्था तसेच नरेंद्र महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेने तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात तर किरकोळ जखमींना पाली व लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले. सकाळी सात वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातानंतर जखमी प्रवाशांना लक्झरी बसमधून बाहेर काढण्यासाठी तसेच रुग्णालयात पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अग्निशमन केंद्र रत्नागिरी उप अग्निशमन अधिकारी व्ही. के. राणे, एच. व्ही. आखाडे, एस. बी. पाटील, व्ही. के. गोसावी, एस. एस. पष्टे, सी. आर. ठाकूर, एस. एन. सांगळे, पी. एस. धायतडक, ए. एम. पवार, पी. पी. इंगळे, लांजा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड, हेड. कॉन्स्टे. विलास जाधव, नासिर नावळेकर, नितेश राणे, हातखंबा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ व सहकारी, आधार सोशल फाउंडेशन लांजा संस्थेचे अध्यक्ष राजू जाधव आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

या अपघात प्रकरणी ट्रकचालक दिलावर सुमार खान (३६ वर्षे) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. विलास जाधव हे करत आहेत. दरम्यान, या अपघातामध्ये नयन दीपक कुलकर (१० वर्षे, रा. विरार, ठाणे) प्रकाश थकटू धावडे (५४ वर्षे, रा. वारगाव, कणकवली जि. सिंधुदुर्ग), ऋतवी अभिषेक पारकर (१० वर्षे रा. मुंबई), प्रांजली मंगेश राऊत (९ वर्षे, रा. मुंबई), यशवी अभिषेक पारकर (५ वर्षे, रा. मुंबई), सुधा महेश सावंत (२८ वर्षे, देवगड वळवंडे, जि. सिंधुदुर्ग), अश्विनी जयवंत वालम (२० वर्षे, रा. मुंबई), आराध्या अभिषेक पारकर (३८ वर्षे, रा. मुंबई), लक्झरी बसचालक ऋषिकेश अनंत जोशी (२३ वर्षे, रा. विरार मकरपाडा), दुसरा चालक कुणाल प्रकाश कांबळे (२६ वर्षे, रा. विरार), ट्रक क्लीनर सुभानखान दिने खान (२२ वर्षे, रा. जैसमलेर राजस्थान) हे किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी पाली व लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातातील विश्वास लक्ष्मण राऊत, सूर्यकांत शंकर साळवी, विनिता विश्वास राऊत आणि ट्रक चालक दिलावर सुमार खान यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना अधिक उपचारसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg