loader
Breaking News
Breaking News
Foto

सावर्डे परिसरात चोऱ्यांचा धुमाकूळ; तीन महिन्यांपासून चोरट्यांचा सुळसुळाट!

रत्नागिरी, (प्रतिनिधी) - सावर्डे तसेच आजूबाजूच्या परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक चोरीच्या घटनांबाबत पोलिसांकडे रीतसर गुन्हे दाखल होत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांनी या चोरीच्या घटनांचा चांगलाच धसका घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे परिसरातील दहिवली, खरवते, मांडके आणि सावर्डे या गावांमध्ये बंद असलेल्या घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. घरातील चांदीच्या वस्तू, देवघरातील पितळ व तांब्याच्या वस्तू, घडविलेले देव, देवांच्या चांदीच्या टाकांसह अन्य मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याचे समोर आले आहे. काही घरांमधून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू चोरीला गेल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरट्यांकडून केवळ वस्तूंची चोरीच केली जात नाही, तर घरातील कुलूप, कपाटे आणि लॉकर तोडून घरात मिळेल त्या वस्तूच्या शोधात मोठ्या प्रमाणात नासधूसही केली जात आहे. या परिसरातील अनेक कुटुंबे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये वास्तव्यास असल्याने त्यांची घरे बहुतांश वेळा बंद असतात. अशा बंद घरांची रेकी करून चोरटे संधी साधत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहा, वीस, तीस, चाळीस किंवा पन्नास हजार रुपयांच्या आसपासच्या चोरीच्या घटनांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया, पोलिस ठाण्याच्या चकरा आणि इतर त्रास टाळण्यासाठी अनेक पीडित नागरिक तक्रार देण्यासही पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी, प्रत्यक्षात घडणाऱ्या चोरीच्या घटनांची अधिकृत नोंद किती होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, काही चोरी झालेल्या घरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असूनही तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या परिस्थितीमुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरांची सुरक्षितता हा ऐरणीवरील विषय बनला असून, पोलिस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. चोरीच्या सर्व घटनांची माहिती संकलित करून योग्य तपास करावा, बंद घरांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि पीडित नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे. आता तरी वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून सावर्डे परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg