loader
Breaking News
Breaking News
Foto

हत्ती हटाव आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटना एकवटल्या! २ ऑक्टोबरला पाळये येथे गणपत दळवींच्या नेतृत्वाखाली आंदोलन; १२ संघटनांचा सहभाग

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती-बागायती उद्ध्वस्त होत असताना, या प्रश्नावर आता सिंधुदुर्गातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पाळये गावचे ७५ वर्षीय ज्येष्ठ शेतकरी गणपत दळवी यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबर २०२६ रोजी पाळये येथे हत्ती हटाव आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. दोडामार्ग तालुका विकास मंडळ मुंबईसह सुमारे १२ संघटना आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्तींच्या कळपांकडून शेती आणि बागायतींची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भात, नाचणी, केळी, बांबू यांसारख्या पिकांसह अनेक वर्षे मेहनत करून उभी केलेली नारळ आणि सुपारीची झाडेही हत्तींच्या तडाख्यात उद्ध्वस्त होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

८ ते १० वर्षे झाडांची निगा राखल्यानंतर मिळणारे उत्पन्न वन्यप्राण्यांच्या एका रात्रीच्या उपद्रवामुळे नष्ट होत असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीच उद्ध्वस्त झाली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. हत्तींच्या उपद्रवाविरोधात यापूर्वीही आंदोलने झाली आहेत. शासनाकडून विविध आश्वासने देण्यात आली, नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू झाली; मात्र हत्तींचा उपद्रव पुन्हा पुन्हा वाढत असल्याने शेतकर्‍यांचा प्रश्न कायम आहे. यामुळेच यावेळी गणपत दळवी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी निर्णायक लढ्यासाठी एकत्र आले आहेत. शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन हत्तींच्या प्रश्नावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. हत्तींच्या उपद्रवाचा प्रश्न आजचा नसून यापूर्वीही त्यासाठी मोठे आंदोलन झाले होते. सन २००५ च्या दरम्यान दोडामार्ग तालुका विकास मंडळाच्या पुढाकाराने मुंबईच्या आझाद मैदानावर हत्ती हटाव आंदोलन करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

या आंदोलनात सुमारे ५०० चाकरमानी सहभागी झाले होते. स्थानिक लोकनेते सुरेशभाई दळवी यांच्यासह गणपत दळवी यांनीही त्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर शासनाकडून ‘एलिफंट गो बॅक अ‍ॅट होम’ मोहीम राबविण्यात आली होती. हत्ती व वन्यप्राण्यांकडून होणार्‍या नुकसानीची भरपाई देण्यासही सुरुवात झाली. मात्र त्यावेळी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने हत्ती पुन्हा या भागात परतले आणि उपद्रव वाढत गेला, अशी शेतकरी वर्गाची भूमिका आहे. हत्ती व वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची झळ आता दोडामार्गसोबतच सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यातील शेतकर्‍यांनाही बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरीही या प्रश्नावर एकत्र येत असून २ ऑक्टोबरच्या पाळये येथील आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg