loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयातील घटना; तब्बल सहा तासांच्या कालावधीत चोरी, सावर्डे पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - साखरपुड्याचा आनंदसोहळा सुरू असतानाच चोरट्याने संधी साधून वराच्या खोलीत ठेवलेल्या हँडबॅगमधील तब्बल १ लाख ८७ हजार ३४९ रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात १ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे लग्नसमारंभातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे (पूर्व) येथील कोपरी परिसरातील नाना सोसायटीत राहणार्‍या जागृती संदेश मोरे (वय ३२) यांनी आपले ४४.४८० ग्रॅम वजनाचे, दोन सोन्याच्या डवली असलेले पट्टीच्या डिझाइनचे मंगळसूत्र सुरक्षिततेसाठी आईकडे दिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१ नोव्हेंबर रोजी कोंडमळा येथील शारदा मंगल कार्यालयात साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जागृती यांच्या आईने मंगळसूत्र एका बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स हँडबॅगेत ठेवला होता. ही बॅग मंगल कार्यालयातील वराच्या खोलीत ठेवण्यात आली होती. दरम्यान, सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधत हँडबॅगेतील बॉक्समधून सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. कार्यक्रमाच्या गडबडीत सुरुवातीला चोरीचा प्रकार लक्षात आला नाही. मात्र, मंगळसूत्र गायब झाल्याचे समजल्यानंतर मोरे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोधाशोध आणि चौकशी केली. तरीही मंगळसूत्र न मिळाल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.

टाईम्स स्पेशल

याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने गुन्हा (००/२०२६) नोंदविण्यात आला. त्यानंतर संबंधित कागदपत्रे सावर्डे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५८ वाजता भारतीय न्यायसंहिता कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. साखरपुड्यासारख्या मंगलमय सोहळ्यातच लाखोंच्या दागिन्यांवर चोरट्याने हात साफ केल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रमादरम्यान मौल्यवान दागिन्यांची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी किती महत्त्वाची आहे, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान आता सावर्डे पोलिसांसमोर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg