loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनोग्राफीतील बाळाचा चेहरा आता थ्रीडी स्वरूपात जतन करता येणार ; ‘लाइफप्रिंट ३डी’कडून ‘फर्स्टएम्ब्रेस’ तंत्रज्ञान भारतात दाखल

कल्याण : गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफी करताना स्क्रीनवर दिसणाऱ्या बाळाच्या चेहऱ्याकडे आई-वडील दोघेही मोठ्या उत्सुकतेने पाहतात. बाळाचे नाक, डोळे आणि चेहऱ्याची ठेवण पाहण्याचा हा क्षण त्यांच्यासाठी खास असतो. आतापर्यंत ही आठवण केवळ सोनोग्राफीच्या प्रतिमांपुरती मर्यादित होती. मात्र, आता या प्रतिमांपासून बाळाच्या चेहऱ्याची थ्रीडी प्रतिकृती तयार करून ती प्रत्यक्ष पाहता येणार आहे. एआय तंत्रज्ञान आणि थ्रीडी प्रिंटिंगच्या मदतीने ही सुविधा आता भारतातीयांसाठी उपलब्ध होणार आहे.अमेरिकेत विकसित झालेल्या या तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), प्रगत प्रक्रियेची प्रतिमा आणि थ्रीडी प्रिंटिंगचा वापर केला जातो. अल्ट्रासाऊंडमध्ये दिसणाऱ्या प्रतिमांचे विश्लेषण करून त्या प्रत्यक्ष हाताळता येतील अशा थ्रीडी मॉडेलमध्ये त्यांचे रूपांतर केले जाईल. लाइफप्रिंट ३डीची ही संकल्पना रेडिओलॉजिस्ट डॉ. आनंद भेरवानी, डॉ. संदेश रोठे आणि डॉ. शीतल काबरा यांनी वास्तव्यात उपलब्ध करुन दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अल्ट्रासाऊंडमधील प्रतिमांपासून अशी प्रतिकृती तयार करणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. बाळाची गर्भातील स्थिती, प्रतिमांमधील रचना, हालचाली आणि चित्रांची गुणवत्ता यामुळे चेहऱ्याचे बारकावे स्पष्टपणे मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रतिकृती तयार करण्यापूर्वी उपलब्ध प्रतिमांची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यावर आवश्यक प्रक्रिया केली जाते. या तंत्रज्ञानाला संशोधनाचाही आधार आहे. २०२० मध्ये ‘जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक, गायनॅकॉलॉजिक अँड निओनेटल नर्सिंग’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात ९६ गर्भवती महिलांचा समावेश होता. यामध्ये केवळ सोनोग्राफीच्या प्रतिमा पाहणाऱ्या महिलांच्या तुलनेत बाळाची थ्रीडी प्रतिकृती मिळालेल्या महिलांमध्ये आई आणि गर्भातील बाळ यांच्यातील भावनिक नात्याची जाणीव अधिक वाढल्याचे आढळून आले आहे. थ्रीडी प्रतिकृती मिळालेल्या गटात ही वाढ सरासरी ८.७ टक्के, तर केवळ सोनोग्राफी प्रतिमा पाहिलेल्या गटात ४.९ टक्के होती.लाइफप्रिंट ३डीचे सहसंस्थापक आणि भागीदार डॉ. संदेश रोठे यांनी सांगितले की, पालकांसाठी गर्भातील बाळाचा पहिला चेहरा पाहणे हा आयुष्यभर स्मरणात राहणारा क्षण असतो. ही आठवण प्रत्यक्ष हातात घेता येईल अशा स्वरूपात जतन करण्याची संधी या तंत्रज्ञानातून मिळणार आहे. यासाठी वैद्यकीय कारणांसाठी आधीच करण्यात आलेल्या सोनोग्राफीच्या प्रतिमांचाच वापर केला जाणार असून, केवळ प्रतिकृती तयार करण्यासाठी अतिरिक्त सोनोग्राफी करण्यास प्रोत्साहन दिले जाणार नाही.सहसंस्थापक आणि पार्टनरशीपमध्ये असलेल्या डॉ. शीतल काबरा यांनी सांगितले की, प्रत्येक सोनोग्राफीची प्रतिमा वेगळी असते. बाळाची स्थिती, प्रतिमांमधील रचना आणि चित्रांची स्पष्टता यावर प्रतिकृतीचा दर्जा अवलंबून असतो. त्यामुळे उपलब्ध प्रतिमांचे काळजीपूर्वक परीक्षण करून त्यातील दिसणारी वैशिष्ट्ये जतन करण्यावर भर दिला जातो. मात्र, मूळ प्रतिमेत जे स्पष्ट दिसत नाही, ते प्रतिकृतीत अचूकपणे दाखवणे शक्य नसते.

टाइम्स स्पेशल

गर्भातील बाळाच्या प्रतिकृतींपुरतेच हे तंत्रज्ञान मर्यादित राहणार नाही. सीटी स्कॅन आणि एमआरआयमधील प्रतिमांच्या आधारे हृदय, फुफ्फुसे, श्वसनमार्ग, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, मणका, हाडे आणि रक्तवाहिन्यांची थ्रीडी मॉडेल तयार करण्यावरही कंपनीकडून संशोधन केले जात आहे. या प्रतिकृतींमुळे मानवी शरीरातील अवयवांची रचना समजून घेणे सोपे होऊ शकते. वैद्यकीय शिक्षण, प्रात्यक्षिके तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. कंपनीचे सहसंस्थापक आणि भागीदार डॉ. आनंद भेरवानी यांनी सांगितले की, एआय आणि आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय प्रतिमांचा वापर करण्याच्या पद्धती बदलत आहेत. पूर्वी अतिशय वेळखाऊ आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेली कामे आता अधिक सुलभ होत आहेत. वैद्यकीय प्रतिमांकडे केवळ पाहण्याच्या दृष्टीने नव्हे, तर त्यांना स्पर्श करून समजून घेण्याच्या दृष्टीनेही पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे.देशभरात उपलब्ध होणार सेवा ‘फर्स्टएम्ब्रेस’ ही सेवा देशभरातील सोनोग्राफी केंद्रे आणि रुग्णालयांमार्फत तसेच कंपनीच्या www.lifeprint3d.com या संकेतस्थळावरून थेट पालकांना उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना घरपोच प्रतिकृती देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg