loader
Breaking News
Breaking News
Foto

मुणगे येथील वृटवक्षाभोवती ३१ ऑक्टोबर रोजी मानवी साखळी; जंगलतोड थांबविण्यासाठी गोपुरी आश्रमचा पर्यावरण जागर उपक्रम : प्रा. राजेंद्र मुंबरकर

कणकवली (प्रतिनिधी) - टोरेंट पॉवर प्रकल्पासाठी कर्जत-भिमाशंकर परिसरातील सरंक्षण जंगलमय भागात वृक्षतोड करण्यात येत आहे. या परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी गोपुरी आश्रम कणकवली यांच्यावतीने शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. देवगड तालुक्यातील मुगणे येथे असलेल्या वटवृक्षाला मानवी साखळी करून पर्यावरण जागर उपक्रमाचे आयोजन केले आहे. सरकारच्या प्रकल्पांना गोपुरी आश्रमाचा विरोध नाही, तर सरकारने पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही असे प्रकल्प राबवावेत. नागरिकांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव करणे, पर्यावरण विषयक प्रश्नांवर लोकसहभाग वाढवणे आणि भावी पिढयांसाठी नैसर्गिक वारसा जतन करण्याचा सामूहिक संकल्प दृढ करणे करणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी व्यक्त केली. गोपुरी आश्रमाच्या चिकूच्या बागेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर बोलत होते. यावेळी सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, सदस्य संदीप सावंत, नितीन तळेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबरकर म्हणाले, टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीतील प्रस्तावित ३७७ हेक्टर क्षेत्रातील जंगलाचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी गोपुरी आश्रम, कणकवली यांच्यावतीने मुणगे येथे पर्यावरण जागर उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडाभोवती मानवी साखळी करून सह्याद्रीचे जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक वारसा जतन करण्याचा सामूहिक संकल्प व्यक्त केला जाणार आहे. वाढते तापमान, हवामान बदल, जंगलांचा आणि जैवविविधतेचा होणारा विनाश या पार्श्वभूमीवर पश्चिम घाटासारख्या पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशातील जंगलांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. या परिसरातील जुन्या वृक्षांसह विविध वनस्पती, पक्षी, वन्यजीव, कीटक आणि सूक्ष्मजीव यांच्या परस्परावलंबी जीवनचक्रामुळे येथील परिसंस्थेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जंगल म्हणजे केवळ झाडे नव्हेत, तर हजारो वर्षांत विकसित झालेली एक समृद्ध परिसंस्था आहे. त्यामुळे जंगलातील वृक्षतोडीची भरपाई केवळ नवीन झाडे लावून होऊ शकत नाही. जुन्या जंगलातील जैवविविधता, नैसर्गिक अधिवास आणि पर्यावरणीय समतोल पुन्हा निर्माण होण्यासाठी अनेक दशके किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. विकासाच्या नावाखाली पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांवर होणारे परिणाम गांभीर्याने तपासणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय परिणामांचे योग्य मूल्यमापन, लागू असलेल्या वनविषयक कायद्यांचे पालन, वनहक्क कायदा २००६ मधील तरतुदींची अंमलबजावणी आणि संबंधित ग्रामसभांचे कायदेशीर अधिकार यांचा सखोल विचार व्हावा, अशी गोपुरी आश्रमाची भूमिका आहे. वृक्षतोडीनंतर पर्यायी वृक्षारोपण करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी नैसर्गिक जंगलाची जागा नव्याने लावलेली झाडे तात्काळ घेऊ शकत नाहीत. म्हणूनच विकासाच्या कोणत्याही प्रकल्पात पर्यावरणीय हानी कमीत कमी ठेवणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि स्थानिक नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे यांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचा उद्देश केवळ जंगलसंवर्धनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे एवढाच नसून, नागरिकांमध्ये निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे, पर्यावरणविषयक प्रश्नांवर लोकसहभाग वाढवणे आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा जतन करण्याचा सामूहिक संकल्प दृढ करणे हा आहे. सिंधदुर्ग जिल्ह्याची समृद्ध जैवविविधता, सह्याद्रीचे पर्यावरणीय महत्त्व आणि पुढील पिढ्यांचे नैसर्गिक संसाधनांवरील हक्क लक्षात घेऊन या पर्यावरण जागर उपक्रमात निसर्गप्रेमी नागरिक, पर्यावरण अभ्यासक, विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व संवेदनशील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोपुरी आश्रम यांच्यावतीने करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg