loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा घटस्थापनेच्या पवित्र दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलाच्या नामघोषाने, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद, हरिपाठ आणि सुस्वर भजनांच्या माध्यमातून भाविकांनी विठुरायाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला. कळंबस्ते तेलेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर अतिशय जुने असून, मंदिराचा नेमका इतिहास फारसा ज्ञात नाही. मात्र, हे मंदिर राजू पाटील यांच्या घराशेजारी असल्याने पाटील कुटुंबीयांकडून वर्षानुवर्षे मंदिरातील पूजा-अर्चा नियमितपणे केली जात आहे. या छोटेखानी मंदिराचा गतवर्षी दत्तप्रसाद ऊर्फ राजू पाटील यांनी स्वखर्चाने जीर्णोद्धार करून मंदिराला सुंदर स्वरूप प्राप्त करून दिले. त्यानंतर यंदा मंदिराचा प्रथम वर्धापन दिन धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री विठ्ठलाची मंत्रघोषात विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. दुपारी आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. भक्तिभावाने सुरू झालेल्या या सोहळ्यात दिवसभर विठ्ठलनामाचा गजर आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी सहा वाजता संगमेश्वर येथील शास्त्रीतीरी संत वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि संतांच्या अभंगांच्या स्वरांत हरिपाठ रंगला. त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. रात्री भजनांचा विशेष कार्यक्रम भाविकांसाठी पर्वणी ठरला. देवरूख-पाटगाव येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. प्रदीप लिंगायत आणि आगर्णळ-जाकादेवी येथील भजनी बुवा मारुती मेस्त्री यांनी आपल्या सुस्वर भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या अभंगांनी आणि भजनांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात या भजनांचा मनमुराद आनंद घेतला.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्यात विठ्ठलाची भूमिका साकारणारा पार्थ पाटील आणि वारकऱ्याच्या वेशात मृदंग वाजवणारा साईराज पाटील यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या भक्तिमय सादरीकरणाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान उमटले. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांची सांगता रात्री दोन वाजता कळंबस्ते तेलेवाडीतील स्थानिक ग्रामस्थांच्या वारकरी दिंडीने करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा अखंड जयघोष करत निघालेल्या या दिंडीने वर्धापन दिन सोहळ्याला भक्तिपूर्ण पूर्णविराम दिला. ‘पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या नामघोषाने अवघी तेलेवाडी भक्तिरसात रंगून गेली. श्री विठ्ठल मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यातून वारकरी संप्रदायाची परंपरा, सामूहिक भक्ती आणि ग्रामस्थांची धार्मिक एकजूट यांचे सुंदर दर्शन घडले. पाटील परिवाराच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागातून पार पडलेल्या या सोहळ्याने कळंबस्ते तेलेवाडीच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक भक्तिमय अध्याय जोडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg