loader
Breaking News
Breaking News
Foto

६० वर्षीय महिलेला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून गळ्यातील ९० हजाराचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्याचा पोबारा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - घर कामासाठी जात असलेल्या एका ६० वर्षीय महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला दुचाकीवर बसवून नंतर ‘फोटो काढतो’ असे सांगत तिच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे वेरवली परिसरात खळबळ उडाली असून, लांजात चोरट्यांची भिती निर्माण झाली आहे. लांजा तालुक्यातील रिंगणे येथे घरफोडी करणार-या दोन सराईत चोरट्यांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याची घटना ताजी असतानाच आता वेरवली येथे अज्ञात चोरट्याने मंगळसूत्र चोरल्याची घटना घडल्याने पुन्हा चोरट्यांनी लांजात डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेरवली खुर्द डोळेवाडी येथील रहिवासी सरिता दिनकर बाणे (वय ६०) या मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक येथील डॉ. मुळे यांच्या घरी नेहमीप्रमाणे घरकामासाठी पायी जात होत्या. त्या वेरवली खुर्द शाळा क्रमांक १ च्या पुढील वळणाजवळ आल्या असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना आवाज देत, आजी कुठे चालला आहात, तुम्हाला पुढे सोडतो, असे सांगितले. अनोळखी व्यक्तीने आपल्याला लिफ्ट देण्याच्या उद्देशाने मदत केली असल्याचे समजून बाणे या त्याच्या दुचाकीवर बसल्या.

टाईम्स स्पेशल

संबंधित इसमाने त्यांना मुळे यांच्या घराच्या गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर उतरवले. त्यानंतर बाणे या पायी चालत मुळे यांच्या घराच्या गेटजवळ पोहोचून आत जात असतानाच तो इसम पुन्हा मोटारसायकलवरून त्यांच्या मागोमाग तेथे आला. त्याने आजी थांबा, तुमचा फोटो काढतो असे सांगून मोबाईलचा कॅमेरा तोंडाजवळ आणण्याचा बहाणा करत. महिला काही समजून घेण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचे, दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून तोडले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने मोटारसायकलवरून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेत सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या बाणे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg