loader
Breaking News
Breaking News
Foto

खाऱ्या पाण्याचा प्रश्न 'जैसे थे'; साजिद सरगुरोह यांचे आजपासून नागरिकांसमवेत उपोषण!

चिपळूण : शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड या चार भागांतील खारे व मचूळ पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने काँग्रेसचे गटनेते, नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. १७ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या उपोषणावेळी नगराध्यक्ष आणि नगर परिषद प्रशासनाने २५ नोव्हेंबरपर्यंत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिलेली मुदत संपत आली तरी ठोस उपाययोजना झालेली नसल्याने आज बुधवार, २५ नोव्हेंबरपासून नागरिकांसमवेत नगर परिषदेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पर्यायी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय सरगुरोह यांनी घेतला आहे. शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खाऱ्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात खारे व मचूळ पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारत १७ नोव्हेंबरपर्यंत प्रश्न न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी विविध समित्यांचे सभापती, नगरसेविक, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गोवळकोट-पेठमाप परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी पाणी समस्येची कारणे जाणून घेऊन संभाव्य उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच २५ नोव्हेंबरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने साजिद सरगुरोह यांनी आता उपोषणाचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले आहे.

टाईम्स स्पेशल

शहरातील बहुतांश भागांना गोडे पाणी मिळत असताना या चार भागांतील नागरिकांना मात्र आजही खारे व मचूळ पाणी वापरण्याची वेळ येत आहे. या समस्येवर पर्याय उपलब्ध असतानाही नगर परिषद प्रशासनाकडून प्रभावी कार्यवाही होत नसल्याची नाराजी साजिद सरगुरोह यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. नगराध्यक्षांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतरही खाऱ्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याने आता २५ नोव्हेंबरच्या उपोषणाच्या इशाऱ्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासन उपोषणापूर्वी काही ठोस निर्णय घेणार की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg