loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंब्रल ग्रामसेवकाच्या कामकाजावर गंभीर आक्षेप; तात्काळ बदलीची मागणी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : कुंब्रल ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक कसालकर यांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम गुणाजी कदम यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुंब्रल ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या कसालकर यांच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत कदम यांनी निवेदनात विविध आरोप केले आहेत. ग्रामसभा वेळेत न घेणे, ग्रामसभेचे इतिवृत्त योग्य प्रकारे न लिहिणे, मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची व विकासकामांची माहिती न देणे, असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणे, मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही गावात राहत असल्याचे भासवून घरभाडे भत्ता घेतल्याचा संशय, तसेच गावातील विविध प्रकरणांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे, फळबाग व काजू पिकांच्या नुकसानीसंदर्भातील शेतकर्‍यांचे पंचनामे आणि प्रस्ताव वेळेत शासनाकडे न पाठविल्यामुळे काही शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोपविलेली डखठ ची कामे प्रत्यक्ष गावात फिरून करण्याऐवजी कार्यालयात बसून केली जात असल्याचा आक्षेपही कदम यांनी घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

कुंब्रल गावाच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी संबंधित ग्रामसेवकाची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व कार्यक्षम ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सखाराम गुणाजी कदम यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत तालुका पंचायत सभापती यांनाही माहिती व कारवाईसाठी देण्यात आली आहे. आता या निवेदनाची पंचायत समिती प्रशासन कितपत दखल घेते, संबंधित आरोपांची चौकशी होते का आणि ग्रामसेवकाच्या बदलीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे कुंब्रल ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg