loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये धक्कादायक घटना! ७ वर्षीय बालकावर लोखंडी रॉडने हल्ला; डोक्याला मार लागून बालक जखमी, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : खेड शहरात अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. घराजवळील मैदानात खेळण्यासाठी जात असलेल्या ७ वर्षीय बालकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खेड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस उपेंद्र घोडे हा ७ वर्षीय बालक मैदानात खेळण्यासाठी जात असताना ही घटना घडली. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास कोंडी आळी परिसरात ही घटना घडली. मैदानाकडे जात असताना मागून आलेल्या एका बुरखाधारी अनोळखी महिलेने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यामुळे तेजस जखमी होऊन खाली पडला. त्याचा मोठा भाऊ ओम मैदानाकडे जात असताना तेजस जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित महिला घटनास्थळावरून पळून गेली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तेजसचे वडील उपेंद्र भिकाजी घोडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात हल्लेखोर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, खेड पोलीस पुढील तपास करीत आहेत. अज्ञात महिलेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला मार लागल्याने तेजस जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लहान मुलावर असा जीवघेणा हल्ला झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या, भर वस्तीत, खेळायला जाणाऱ्या लहान मुलावर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे खेडमधील पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. “लहान मुले घराबाहेर खेळायला तरी सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न आता पालकांकडून विचारला जात आहे.

टाईम्स स्पेशल

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही महिला कोण होती? तिने हा हल्ला का केला? यापूर्वी काही वाद होता का? की मानसिक स्थितीमुळे हा हल्ला झाला? याबाबत पोलीस तपास करत आहेत. हल्लेखोर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, खेड पोलीस पुढील तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणे, तसेच संशयित महिलेचा शोध घेणे यावर पोलीस भर देत आहेत. लवकरच आरोपी महिलेला अटक होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर खेडमधील नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, शाळा, मैदान, खेळाच्या ठिकाणी लक्ष ठेवावे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg