loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देणार; रहिवाशांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वांद्रे, (प्रतिनिधी) : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासह रहिवाशांचे लीज रेंटचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी ठोस कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीत मतदारसंघातील जुन्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातील अडचणी, रखडलेले प्रकल्प आणि रहिवाशांच्या विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. “वर्तकनगर, शिवाई नगर, पवार नगर आणि स्वामी विवेकानंद नगर यांसह मतदारसंघातील सुमारे ४० वर्षे जुन्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास हा केवळ बांधकामाचा विषय नसून हजारो कुटुंबांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक भवितव्याचा प्रश्न आहे. रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे वेळेत मिळावीत, विकासकांकडून थकीत भाडे मिळावे आणि पुनर्विकासातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करणे आवश्यक आहे,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“निधीअभावी कोणत्याही पात्र लाभार्थ्याचे घराचे स्वप्न अपूर्ण राहू नये, ही आमची भूमिका आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. जमीन, मालकी हक्क, बांधकाम परवानग्या, आर्थिक व्यवहार्यता आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून पारदर्शक प्रक्रिया निश्चित करावी,” असे निर्देश देण्यात आल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. म्हाडाच्या जमिनीवरील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान रहिवाशांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी लीज रेंट माफीचा प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून, मोजणी शुल्कही भरले आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर शासनाचे नाव असल्याने जमिनीच्या नोंदी म्हाडाच्या नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

यासाठी कोकण म्हाडा, वास्तुविशारद आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त नगररचना अधिकारी यांनी दिवाळीनंतर संयुक्त बैठक घेऊन कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेमुळे अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) मिळविण्याच्या कामालाही गती मिळणार आहे. या बैठकीला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे महानगरपालिका आयुक्त, कोकण म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, नगरविकास विभागाचे अधिकारी, वास्तुविशारद, नगरसेविका सौ. परिषा प्रताप सरनाईक आणि शिवाई नगरमधील गृहनिर्माण संस्थांचे सभासद उपस्थित होते. “जुन्या वसाहतींचा पुनर्विकास, रखडलेली घरे आणि रहिवाशांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. नागरिकांना दिलासा देणे आणि त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे प्राधान्य आहे,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg